पुण्यातील 'ते' १९ नगरसेवक संपर्कात आहेत ? अजित पवार यांचं 'सूचक' वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 03:09 PM2021-01-22T15:09:59+5:302021-01-22T15:22:01+5:30
काही दिवसांपूर्वी पुण्यातील भाजपचे १९ नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली होती.
पुणे : आगामी काळात पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका होत आहे. त्यामुळे सध्या महापलिकेत सत्ताधारी पक्ष असलेला भाजप व राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत मोर्चेबांधणीला सरुवात केली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी भाजपचे १९ नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली होती. त्यानंतर काहीकाळ भाजपच्या गोटात देखील चिंतेचे वातावरण होते. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे वृत्त फेटाळून लावत आमचे कुणीही नगरसेवक इतर पक्षात जाणार नसून इतर पक्षातलेच लोक आमच्या संपर्कात असल्याचे सांगितले होते. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
अजित पवार हे एका बैठकीसाठी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यासह विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.तसेच त्यांनी भाजपचे १९ नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या मुद्द्यांवर भाष्य केले. पवार म्हणाले, काही जण जसे वारे बदलते तसे बदलतात. पण इतर पक्षाच्या नेतेमंडळींनी भेट घेतली तर त्यापाठीमागे त्यांची काही विकास कामे करून घ्यायची हाही उद्देश असतो. नेहमी बेरजेचे राजकारण करायचे असते. त्याचसोबत इलेक्टिव्ह मेरिटही बघायचा असतो.
धनंजय मुंडे प्रकरणावर अजित पवार म्हणाले...
धनंजय मुंडें यांच्याबाबत दाखल करण्यात आलेली तक्रार संबंधित महिलेने मागे घेतली असल्याची बातमी सकाळीच कानावर आली. पण त्यांच्या प्रकरणाचा संपूर्ण तपास होऊ द्या, सत्य बाहेर येऊ द्या असे आम्ही म्हणत होतो. पण तरीदेखील धनंजय मुंडे आणि आमच्या पक्षाची बदनामी करण्यात आली. मात्र अशा आरोपांमुळे बहुजन समाजातून पुढे आलेला एक सहकारी बदनाम होतो. त्याचं कुटुंब डिस्टर्ब होतं, त्याला वाली कोण? मान्य आहे की काही लोक चुका करत असतील पण त्याची किंमत सगळ्यांनीच मोजायची का? एखादी राजकीय व्यक्ती प्रचंड काम करत एखाद्या पदापर्यंत पोहचते. त्यासाठी अफाट कष्ट घ्यावे लागतात. पण असं काही जेव्हा घडतं तेव्हा त्याला एक क्षणात पायउतार व्हावे लागते. याचा सगळ्यांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे.
आम्हाला जेव्हा परवानगी मिळेल तेव्हा आम्ही लस घेऊ लसीकरणाबाबत अडचणी आहेत. ग्रामीण भागात प्रमाण जास्त आहे. 60/65 टक्के लसीकरण झालं. मात्र शहरात 25 / 30 टक्के च लोकांनी लस घेतली. लोक ऐनवेळी निर्णय बदलतात. कोविन ॲपची समस्या आहे, अशी कारणे आहे. खासगी डॉक्टर्स ना पण लस द्यावी अशी मागणी आहे. त्याबाबत निर्णय घेऊ असेही ते यावेळी म्हणाले.