पुणे : एका गुन्ह्यातील आराेपीला त्यांनी पकडले आणि त्याच्याकडून त्यांनी एका फरार आराेपीची माहिती मिळवून त्याला अटक केले. त्यानंतर एकप्रकारे फरार आराेपींना पकडण्याचा त्यांनी वसाच घेतला. 2011 साली फरार आराेपींना पकडण्यास त्यांनी सुरुवात केली आणि पाहता पाहता 150 हून अधिक फरार आराेपींना त्यांची जेरबंद केले. ही गाेष्ट आहे पुणे पाेलीस दलाच्या गुन्हे शाखेत काम करणाऱ्या महेश निंबाळकर यांची.
महेश निंबाळकर हे पुणे पाेलीस दलातील गुन्हे शाखेत पाेलीस नाईक पदावर काम करतात. या आधी त्यांनी विविध पाेलीस स्टेशनला काम केले आहे. निंबाळकर यांनी आत्तापर्यंत 151 फरार आराेपींना पकडले आहे. त्याची सुरवात 2011 साली झाली. त्या वर्षी त्यांनी एका गुन्ह्यातील आराेपीकडे ते तपास करत असताना त्यांना एका फरार आराेपीबाबत माहिती मिळाली. त्याला त्यांनी पकडले. त्यानंतर त्यांनी फरार आराेपींची यादी मिळवली. त्यात त्यांच्या लक्षात आले की विविध पाेलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील अनेक आराेपी फरार आहेत. अनेक वर्षे ते पाेलिसांना गुंगारा देत आहेत. त्यांना पकडण्याचा विडाच त्यांनी एकप्रकारे उचलला.
नुकताच त्यांनी 19 वर्षे फरार असलेल्या तसेच राज्यभरात दाेनशेहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या एका आराेपीला जेरबंद केले. गेली 19 वर्षे संजय कांबळे हा आराेपी पाेलिसांना गुंगारा देत हाेता. दाेन वर्षापूर्वी निंबाळकर त्याचा शाेध घेत असताना थाेडक्यात ताे त्यांच्या हातातून सुटला हाेता. यंदा मात्र त्यांनी खबऱ्यांच्या पक्क्या माहितीच्या आधारे सापळा रचत आराेपीला जेरबंद केले. दांडगा जनसंपर्क याच्या आधारे ते आराेपींचा शाेध घेतात. संपूर्ण राज्यभर त्यांनी आपल्या ओळखीच्या आधारे एक जनसंपर्क तयार केला आहे. त्याच्या आधारे ते आराेपींपर्यंत पाेहाेचतात.