पुणे : राज्यातील पारा घसरत असल्याने हुडहुडी भरणारी थंडी सुरु झाली आहे. त्यातच पुण्याचे तापमान 11 अंश सेल्सियसपर्यंत कमी झाल्याने शहरात चांगलीच थंडी वाजत आहे. या थंडीमध्ये रस्त्यावर राहणाऱ्या लाेकांचे हाल हाेत असतात. अशाच लाेकांच्या आयुष्यात रे ऑफ हाेप ही संस्था आशेचा किरण घेऊन आली आहे. या संस्थेकडून रस्त्यावर झाेपणाऱ्या लाेकांना ब्लॅंकेट पुरविण्यात येत असून 2 डिसेंबरपासून आत्तापर्यंत पुणे शहर व पिंपरी चिंचवडमधील 2800 लाेकांना हे ब्लॅंकेट्स देण्यात आले आहेत.
भारतात रस्त्यावर राहणाऱ्यांची संख्या खूप आहे. पुण्यातही रस्त्यावर राहणारी बरीच लाेकं आहेत. त्याचबराेबर मानसिक आजार असणारे अनेकजण सुद्धा रस्त्यावरच झाेपत असल्याचे दिसतात. कडाक्याच्या थंडीत या लाेकांचे खूप हाल हाेतात. अतिथंडीमुळे मृत्यू हाेण्याची देखिल शक्यता असते. पुण्यात रस्त्यावर राहणाऱ्यांच्या मदतीसाठी रे ऑफ हाेपचे तरुण आले आहेत. या संस्थेचे तरुण राेज रात्री पुण्यातील व पिंपरी चिंचवड मधील रस्त्यावर राहणाऱ्या लाेकांना ब्लॅंकेट पुरवत असतात. आत्तापर्यंत अशा 2800 लाेकांना ब्लॅंकेट देण्यात आले आहेत. त्याचबराेबर नागरिकांकडून जुने कपडे घेऊन त्याची चादर शिवून ती सुद्धा लाेकांना वाटण्यात येते. गेल्या 2 वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
रे ऑफ हाेपचे सॅम्युअल डिसाेझा म्हणाले, आम्ही संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवित असताे. त्यातीलच हा एक उपक्रम आहे. आम्ही राेज रात्री 12च्या पुढे घराबाहेर पडून पुणे आणि पिंपरी चिंचवड परीसरात रस्त्यावर झाेपणाऱ्या लाेकांना ब्लॅंकेट्स देत असताे. तसेच नागरिकांकडून जुने कपडे घेऊन त्याची चादर शिवून ती सुद्धा या लाेकांना आम्ही देताे. नागरिकही आम्हाला या कार्यात आता मदत करत आहेत.