कोलकातावरुन गेली कित्येक वर्ष ‘ते’पुण्यात येतात.‘ही’अनोखी परंपरा जपायला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 08:44 PM2018-10-16T20:44:36+5:302018-10-16T20:48:39+5:30
कोलकाताजवळ वर्धमान नावाचं एक छोटंसं गाव..घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही हे कुटुंबिय वडिलांकडून आलेली परंपरा स्वखर्चाने व आपुलकीने जपत आहे.
अतुल चिंचली
पुणे: पश्चिम बंगालची राजधानी असलेली कोलकाताजवळ वर्धमान नावाचं एक छोटंसं गाव..तिथे वास्तव्यास असणारे हे दास कुटुंबीय. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही हे कुटुंबिय वडिलांकडून आलेली परंपरा अगदी आपुलकीने जपत आहे. जवळपास १५ वर्षांपासून दुर्गामातेच्या चरणी वाद्य वाजवण्याची परंपरा टिकवून ठेवताना दास कुटुंबाची भावना असते ती फक्त नि:स्वार्थ सेवा आणि..समर्पणाची..
पुण्यात काँग्रेस भवन येथे पाचव्या माळेपासून कोलकाताच्या बंगाली देवी म्हणजेच दुर्गामातेची पूजा केली जाते. गेली पस्तीस वर्ष येथे देवी बसत आहे. दसऱ्यापर्यंत या मातेचे पूजन केले जात असून या दिवसांमध्ये भवनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यातलाच एक म्हणजे रोज सायंकाळी ७ ते ७.३० च्या सुमारास भव्य आरतीचे आयोजन. या आरतीला हे दास कुटुंबीय गेली कित्येक वर्षे कोलकातामधील धाक, कासी नावाचे वाद्य वाजवत आहेत. कोलकाता मधील वर्धमान नावाच्या लहान गावात हे दास कुटुंबीय वास्तव्यास आहेत. नारू गोपाल दास आणि त्यांची दोन मुले सुजोन, दारोक हे तिघे दुर्गामातेच्या आरतीला वाद्य वाजवण्यासाठी कोलकातावरून पुण्याला येतात. वर्धमान गावात सुद्धा तिघे मिळून रिक्षासायकल चालवण्याचा व्यवसाय करतात. ही जुनी परंपरा अस्तित्वात ठेवण्यासाठी दास कुटुंबीय आजदेखील तितक्यातच तन्मयतेने व उत्साहाने सहभाग होत मातेच्या आरतीला वाद्य वाजूवन भक्ती करण्यात पुढाकार घेत आहे.
गावातील एक लहान घरामध्ये गरीब परिस्थितीत राहूनही कुठल्याही आर्थिक मदतीची अपेक्षा न बाळगता हे वाद्य वाजवण्याचे काम केले जाते. कोलकातामध्येसुद्धा नवरात्रीचे पाहिले सहा दिवस हे कुटुंबीय आरतीला वाद्य वाजवून दुर्गामातेची भक्ती करते.
.................................................................................................
वर्धमान गावात आमचे वडील पूर्वीपासून दुर्गा मातेच्या आरतीला धाक कासी वाजवत आहे. त्याचबरोबर रिक्षासायकल चालवण्याचा व्यवसाय आमचा आहे. मी आणि माझ्या मुलांनी वाद्य वाजवण्याची व रिक्षासायकल व्यवसायाची परंपरा चालू ठेवली आहे. आमची परिस्थिती गरीब असूनही या दुर्गामातेमुळे आमच्या कुटुंबाला मोठी मदत, आनंद, समाधान मिळते. कुठंही वाद्य वाजवायला गेल्यावर आम्ही त्यांच्याकडून कसलीही अपेक्षा ठेवत नाही. परंतु, दुगार्मातेच्या कृपेने लोक स्वत:हून आर्थिक मदत करतात. नारू गोपाल दास, वादक , कोलकाता.
...................................................................................................