Ajit Pawar Speech ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पत्नी तथा बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ बारामतीतील कण्हेरी इथं करण्यात आला. यावेळी अजित पवारांनी आपल्या भाषणातून पवार कुटुंबातील इतर सदस्यांवर जोरदार हल्लाबोल करत त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला उत्तर दिलं. "९१ मध्ये ज्यांचा जन्मही झाला नव्हता ते म्हणतात की, सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या. मग मागच्या ३०-३५ वर्षांत आम्ही काय केलं?" असा सवाल अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना उद्देशून केला आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणाऱ्या पवार कुटुंबातील सदस्यांवर निशाणा साधताना अजित पवार म्हणाले की, "काल कुटुंबातील सगळे लोक साहेबांच्या पायाशी बसले होते. याआधी असं कधी घडलं नव्हतं. मात्र आता लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसंच आमचे चिरंजीव म्हणाले की, सगळ्या संस्था साहेबांनीच आणल्या. मग मागच्या ३०-३५ वर्षांत आम्ही काहीच केलं नाही का? आणि अनेक संस्था बारामतीत आधीपासूनच होत्या. छत्रपती कारखाना कुणी काढला, माळेगाव कारखाना कुणी काढला, हे सगळ्यांना माहीत आहे. विद्या प्रतिष्ठानची स्थापना साहेबांनी केली. मात्र १९९१ साली मी खासदार झाल्यानंतर त्या संस्थेचा वेगाने विस्तार केला," असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विरोधात राहून काही होत नाही. काहीजण म्हणतात आम्ही दोघेच दिल्लीला नडतो. पण विकास कामं करायची असतील, तर नडून नाही तर चांगलं बोलून कामं होतात. त्यामुळे यंदा महायुतीचा खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे, असं आवाहन अजित पवार यांनी बारामतीकरांना केलं आहे.
अजित पवारांना टोला लगावताना काय म्हणाले होते शरद पवार?
सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ काल बारामतीत झाला. यावेळी शरद पवारांनी आपल्या खास स्टाइलमध्ये अजित पवारांचा समाचार घेतला. "अनेक लोकं काहीतरी सांगत असतात. मात्र, आपल्याला वाद वाढवायचा नाही. आपल्याला संघर्ष करायचा नाही. आपल्याला केवळ योग्य बटन दाबायचे आहे. काल कुणीतरी बटण कसे दाबायचे हे सांगितले. पण मी तसे सांगणार नाही. ते सांगताना ते बटण दाबल तर काही कमी पडून देणार नाही, असे देखील त्यांनी सांगितले आहे. मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. देणे घेणे करुन मत मागायची आमची भूमिका नाही. लोकांमध्ये काम करायचे, लोकांना शक्ती द्यायची, लोकांची सेवा करुन मते मागायची ही आमची भूमिका आहे,' असा टोला यावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांना लगावला.