पुणे : नद्यांच्या प्रदुषणाचा मुद्दा नेहमीच चर्चीला जाताे, परंतु त्यांच्या सुधारणेबाबत फारशी पाऊले उचलेली पाहायला मिळत नाहीत. पुण्यातील मुळा मुठा नदीच्या घाटांवर माेठ्याप्रमाणावर कचरा असल्याचे दिसून येते. काही घाटांवर रात्रीच्यावेळी मद्यपींचा अड्डा भरत असल्याचे सुद्धा चित्र असते. अशाच औंध येथील वाघाचा घाट या ठिकाणाचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न पुण्यातील जीवित नदी या संस्थेकडून करण्यात आला. घाटावर मद्यपींनी फेकलेल्या बाटल्या गाेळा करुन संस्थेच्या स्वयंसेवकांनी माशाची प्रतिकृती तयार करत घाट स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला.
नद्यांच्या नैसर्गिक अधिवास कायम रहावा, नद्या स्वच्छ रहाव्यात यासाठी पुण्यातील जीवित नदी ही संस्था काम करते. दरवर्षी या संस्थेच्या वतीने मुठाई नदी फेस्टिवल साजरा केला जाताे. तसेच संस्थेच्या स्वयंसेवकांकडून दर शनिवारी शहरातील विविध घाटांवर स्वच्छता करण्यात येते. औंध येथील वाघाचा घाट हा जुना आणि फेमस असा घाट आहे. परंतु काळानुरुप या घाटाकडे दुर्लक्ष झाल्याने रात्रीच्या वेळी हा घाट आता मद्यपींचा अड्डा झाला आहे. या घाटाच्या बाजूला माेठ्याप्रमाणावर दारुच्या बाटल्यांचा खच पडलेला असताे. या घाटाची जीवीत नदी या संस्थेच्या स्वयंसेवकांकडून स्वच्छता करण्यात येते. परंतु तरीही मद्यपींकडून या घाटावर दारुच्या बाटल्या फेकण्यात येतात. त्यामुळे या दारुच्या बाटल्या घेऊनच माशाचे चित्र तयार करत संस्थेच्या स्वयंसेवकांनी मद्यपींचे कान टाेचण्याचे काम केले. त्यांच्या या माेहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, परंतु मद्यपींकडून अजूनही या घाटाचा वापर दारु पिण्यासाठी हाेत असून याविराेधात प्रशासनाच्या वतीने पाऊले उचलावित अशी मागणी संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे.
याविषयी बाेलताना संस्थेच्या प्राची वाकळे म्हणाल्या, जीवित नदी या संस्थेकडून दरवर्षी मुठाई नदी फेस्टिवल साजरा करण्यात येताे. आमच्या स्वयंसेवकांकडून शहरातील नदी घाटांची नियमित स्वच्छता करण्यात येते. आपल्या शहरातील नदीघाट हा आपला माेठा ठेवा आहे. ताे स्वच्छ रहावा अशी आमची इच्छा आहे. औंध येथील वाघाचा घाट या ठिकाणाला माेठे महत्त्व आहे. परंतु हा घाट सध्या मद्यपींचा अड्डा झाला आहे. येथे माेठ्याप्रमाणावर दारुच्या बाटल्या फेकण्यात येतात. त्यामुळे संपूर्ण घाट अस्वच्छ व नागरिकांसाठी धाेकादायक झाला आहे. त्याचबराेबर बाटल्या व इतर कचरा नदीत फेकल्याने नदीचे प्रदूषण देखील माेठ्याप्रमाणावर हाेत आहे. त्यामुळे आम्ही यंदा या दारुच्या बाटल्यांपासून माशाचे प्रतिकात्मक रचना तयार केली. यातून हा घाट स्वच्छ ठेवण्याचा संदेश आम्ही नागरिकांना दिला.