पिंपरी : इंटरनेटने जग जवळ आले. ऑनलाईन वस्तू विक्रीही जोरात असते. ऑनलाईन वस्तू मागवल्यानंतर त्या घरपोच देण्यासाठी एक वेगळी व्यवस्था काम करत असते. या वस्तूंची डिलीव्हरी करण्यासाठी आजपर्यंत फक्त पुरूषांना नेमले जाते. डिलीव्हरीचे हे काम स्त्रियांना जमणार नाही, हा पुरूषी अहंकार मोडत ति स्वत: वस्तूंची डिलीव्हरी करत संसाराला हातभार लावत आहे. कहाणी आहे किवळे-विकासनगर येथील स्मिता आखाडे यांची...
मुळच्या सोलापुर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या असलेल्या स्मिता यांनी कामाच्या निमित्ताने कुटुंबासहित पुण्यात आल्या. नवऱ्याने ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. त्याला हातभार लागावा, यासाठी आपणही काम करावे. त्यामुळे संसारात दोन पैसे येतील, असे वाटायचे. मात्र, कोणते काम करावे या हे ठरत नव्हते. कारण घरातील काम करून आठ तास एका ठिकाणी बसून काम करणे माझ्याने शक्य नव्हते. नवरा ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात कार्यरत असल्याने त्याला काही मदत करता येईल का याचाही विचार करत होते. त्यामुळे तो करण्याचा निर्णय घेतला. मात्र, एक महिला डिलिव्हरी करू शकेल का? असा सवालही उपस्थित होत होता. त्यावर मात करत स्मिता आखाडे यांनी यशस्वीपणे डिलीव्हरी करतात.
पहिल्यांदा शंका नंतर सहानुभुती...
ऑनलाईन वस्तू ग्राहकांच्या घरी घरपोच करण्याऱ्या वेबसाईटकडे काम मागायला पहिल्यांदा गेले. पार्सल पोहोच करणे महिलांचे काम नाही. ओझे घेवून कोण जाणार त्यामुळे महिलांना आम्ही काम देत नाही असे सांगण्यात आले. नंतर काही कंपन्यांना महिलांना काम देत असल्याचे कळले. त्यात काम करतांना एक महिला डिलीव्हरी करतेय. याचं कौतुक लोकांना वाटत होते. तसेच सहानूभुती पण मिळत गेली. आता परिसरातील माहीती झाल्याने डिलीव्हरी करण्यास जास्त वेळ लागत नाही. काम ही लवकर अन वेळेत होत असल्याने घरी पण जास्त वेळ देता येतो.
स्मार्टफोन अन टेक्नॉलॉजी समजून घेतली...
काम करतांना पहिल्यांदा ही टेक्नॉलॉजी समजून घेतली. मुलगा लहान असतांना त्याला शाळेत सोडण्यासाठी दुचाकी शिकली होती. त्याचा फायदा खूप चांगला झाला. स्मार्टफोन तसेच डिलीव्हरी ॲपचा वापर कसा करायचा हे शिकून घेतले. सुरूवातीला कमी डिलीव्हरी करायचे. आता दोन वर्षे होत आली. आता चांगल्याप्रकारे काम करत आहे. आता जास्त डिलीव्हरी करत असल्याने पैसे चांगले मागे पडतात. - स्मिता आखाडे.