"ईडीची कारवाई बघूनच ‘ते’ तिकडे; 'विकासासाठी गेलो', या म्हणण्यात काही अर्थ नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 12:08 PM2023-08-21T12:08:32+5:302023-08-21T12:08:42+5:30
शरद पवार यांचा अजित पवार गटावर हल्लाबोल
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : विकासासाठी म्हणून तिकडे गेलो असे काहीजण म्हणतात त्याला काही अर्थ नाही. ईडी लागली म्हणूनच ते तिकडे गेले. तिकडे गेलो नाही, तर दुसऱ्या जागी जावे लागेल, अशी भीती त्यांना होती, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता टीका केली.
राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया कार्यशाळेचा समारोप पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात झाला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यावेळी उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले की, अनिल देशमुख १४ महिने आत होते. त्यांच्यावरही दबाव होता. आमच्यात या, नाही तर कारवाई होईल. त्यांनी मी काही केलेच नाही, तर का येऊ असे ठणकावून सांगितले. ज्यांना कारवाईची भीती वाटली ते गेले. आम्ही विकासाला पाठिंबा दिला, विचार नाही बदलले, असे ते आता सांगतात, मात्र त्याला काहीच अर्थ नाही.
सत्तेचा चुकीचा वापर होत असेल, तर त्याला सोशल मीडिया लगाम घालू शकते. लोकशाहीचा आवाज दाबला जात असेल, तर त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे, असेही पवार म्हणाले.
फाळणीचा इतिहास विद्यार्थ्यांवर बिंबवू नका!
- देशाची फाळणी झाल्यानंतर सामाजिक स्थितीबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, असे सीबीएसईने शाळांना पाठविलेल्या परिपत्रकात नमूद आहे.
- फाळणीचा रक्तपाताचा आणि कटुतेची भावना असलेला इतिहास नव्या पिढीच्या मनावर बिंबवणे हे देशाच्या सामाजिक ऐक्यासाठी याेग्य राहणार नाही, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
- सरहद पब्लिक स्कूल, धनकवडी येथील नूतन इमारत आणि गाेपालकृष्ण गाेखले प्रबाेधिनीचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी पवार बोलत होते. ते म्हणाले की, फाळणीचा इतिहास देश विभाजनाचा इतिहास आहे.