पुणे : मला कलेच्या, अभिनयाच्या क्षेत्रात काम करायचे होते. परंतु, घरी काहीही पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे मी जेव्हा मराठवाड्यातून मुंबईला गेलो, तेव्हा खूप बावरलो होतो. काही कळत नव्हते. संघर्ष खूप करावा लागला. माझ्या बोली भाषा वेगळी होती. आमच्या मराठवाड्यातील भाषेचा लहेजा निराळा आहे. तो लगेच ओळखून येतो. त्यामुळे अनेकजण त्यावरून माझी टर उडवायचे, परंतु, त्याच भाषेवर आज मी यशस्वी अभिनेता बनलो, ती बोली माझी ताकद बनली, अशा भावना अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले.
साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित २३ वे साहित्यिक कलावंत संमेलनात रविवारी अनासपुरे यांची मुलाखत राजेश दामले यांनी घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
अनासपुरे म्हणाले की, मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागातून मुंबईत आल्यानंतर माझी थोडी भांबावलेली अवस्था होती. अभिनय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसल्याने संघर्ष खूप होता. परंतु, तो संघर्ष हा मी आनंदाने स्वीकारला. त्या संघर्षाच्या कालावधीत अनेक अपमानास्पद आणि अवहेलनात्मक प्रसंगांना मी सामोरा गेलो. परंतु, याचा खेद न बाळगत बसता मी ध्येयापासून माझे लक्ष विचलीत होऊ दिले नाही.
माझ्या बोलीभाषेवरून आणि माझ्या बोलण्याच्या लहेजावरून माझी टर उडविणारे आज मला फोन करून माझ्याशी त्याच लहेजामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात. ते पाहिल्यनंतर समाधान वाटते. नाना पाटेकर यांना मी गुरूस्थानी मानतो. रूपेरी पडद्यावरचे माझे आगमन नाना पाटेकर यांच्यामुळे सुखकर झाले. तसेच वामन केंद्रे यांनी देखील मला खूप मदत केली.