पुणे: पक्ष संघटनेतील कामकाजाची माहिती नसल्यानेच काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पोलिस आयुक्तांना बालिशपणाचे पत्र देऊन पक्षाला कमकुवत करण्याचे काम केले, अशी टीका काँग्रेसचेच महापालिका शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष नुरूद्दीन अली सोमजी यांनी केली.
प्रदेश उपाध्यक्ष व माजी शहराध्यक्ष असलेले मोहन जोशी, रमेश बागवे यांनी पोलिस आयुक्तांना पत्र देत कोरोना काळातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली होती. शहराध्यक्ष शिंदे यांनी या मागणीला छेद देत पोलिस आयुक्तांना नव्याने पत्र दिले. त्यात त्यांनी संघटित गुन्हेगारीला राजकीय गुन्हे म्हणू नये, पक्षातील एका गटाने दिलेले पत्र अधिकृत समजू नये, शहराध्यक्षांची स्वाक्षरी असेल त्याच पत्रावरील भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका असेल असे नमूद केले होते. शिंदे यांच्या या पत्रावर सोमजी यांनी शिंदेंना संघटनेतील कामकाजाची माहिती नसल्याचे म्हटले आहे.