बारामती : जगद्गुरू संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यात वारकरी वेशात भीक मागण्याचा बहाणा करत चोरी करणाऱ्या टोळीला बारामती गुन्हे शोधपथकाने जेरबंद केले आहे. यामध्ये दोन महिला, एक अल्पवयीन मुलासह दहा जणांचा समावेश आहे.बारामती गुन्हे शोधपथकाचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी याबाबत माहिती दिली. मंगळवारी (दि.१०) संत तुकाराममहाराज पालखी सोहळा लोणी काळभोर येथून मुक्कामी यवत येथे निघाला होता. दुपारी सोहळा उरुळी कांचन येथे विसावला असता पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत चोरी करणाºयांची माहिती मिळाली. यामध्ये पालखी सोहळ्यातजामखेड, लातूर परिसरातून भीक मागण्याचा बहाणा करून चोरी करण्यासाठी काही महिला व पुरुष आले असल्याचे समजले. यावेळी पालखी रथासोबत चालणाºयांवर नजर ठेवली. या वेळी चोरी करणाºया ९ जणांसह अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले.विशेष म्हणजे आलिशान गाडीतून येऊन चोरीचे प्रकार सुरू होते. सुभाष ऊर्फ रमेश शंकर जाधव(वय ३८, रा. पोतवाडी, ता. जातखेड, जि. अहमदनगर), हनुमंत शामराव सकट (वय २०, रा. नानज, ता. जामखेड, जि. अहमदनगर), रेखा सुभाष जाधव (वय ३०, रा. पोतवाडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर), बायडाबाई विकास पवार (वय ३५, रा. सोनारी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), इस्माईल आयुब शेख (वय २२, रा. काडगाव, ता. जि. लातूर), सिद्धेश्वर अंकुश बनसोडे (वय २२, रा. प्रकाशनगर, ता. जि. लातूर), बाळू सुरेश क्षीरसागर (वय २४, रा. औसवाडी, ता. जि. लातूर ), राजू बाबूराव चितारे (वय २२, , रा. औसवाडी, ता. जि. लातूर), प्रवीण बाबूशा पवार (वय २२, रा. कळंब, ता. जि. उस्मानाबाद) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
तुकाराममहाराज पालखी सोहळ्यात चोरी करणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 1:44 AM