पुणे - साथीदारांच्या मदतीने कंपनीच्या गोदामामध्ये असलेल्या साडेआठ लाखांच्या मालाची चोरी केल्याप्रकरणी एका कामगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण ५ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहेराजाबाबू रामावतार सविता (वय २१, रा. रायपूर जिल्हा. बांदा, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अनंत शंकर खडके (वय ३७, रा. गणेश ग्रेस लँड सोसायटी, आंबेगाव) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद दिली होती. फिर्यादी यांच्या आंबेगाव येथील ईन मार्क मुव्ही व्हीजन या गोदामामध्ये १२ जानेवारी रोजी ८ लाख ४५ हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाली होती. त्यामुळे त्यांनी कर्मचारी राजाबाबू, देवसिंग चंडेल, उमेश पाल (सर्व रा. उत्तर प्रदेश) यांच्याविरोधात तक्रार दिली होती. सर्व आरोपी हे खडके यांच्या गोदामामध्ये कामाला होते. त्यानुसार पोलीस आरोपींचा शोध घेत होते.दरम्यान, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड यांना माहिती मिळाली होती, की या प्रकरणातील एक आरोपी उत्तर प्रदेश येथे आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी एक पथक स्थापन करून उत्तर प्रदेशमध्ये जाऊन राजाबाबू याला अटक केली. चौकशी केली असता आरोपी हे चोरी केल्यानंतर त्यांच्या घरी न जाता दिल्ली, गुजरात या ठिकाणी फिरत असल्याची माहिती मिळाली. राजाबाबू याच्याकडून चार महागडे कॅमेरे, प्रोसेसर, मिक्सर लॅपटॉप अशा एकूण ५ लाख७४ हजारांचा मुद्देमाल जप्तकेला आहे.परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णू ताम्हाणे, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड, सहायक पोलीस फौजदार प्रदीप गुरव, पोलीस हवालदार विनोद भांडवलकर, गणेश सुतार यांच्या पथकाने ही कारवाई केली.पोलीस उपनिरीक्षक देविदास गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
गोदामामधील माल चोरणारा नोकर अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 1:11 AM