पुणे : टँकरमधील साबणाचे लिक्विड चोरणारे २ इसम ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १४ लाख ९ हजारांचा माल जप्त केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी सांगितले. या गुन्ह्यातील तक्रारदार यांनी दिनांक ३० सप्टेंबर रोजी तक्रार दिली होती. त्यांच्या मालकीच्या टँकरवरील चालक सूरज बघेल हा मुंबई येथून २० टन २०० किलो लेपसा लिक्विड लोड भरून हैदराबाद येथील कंपनीत देण्यासाठी निघाला होता. परंतू ४ दिवस हा संबंधित चालकाशी संपर्क न झाल्यामुळे कंपनीने त्यास व टँकर शोधण्यासाठी दुसरा चालक पुरुषोत्तम शर्मा यास पाठविले. पुरुषोत्तम याने त्याच्या मोबाईलवरून सूरज बघेल याच्याशी संपर्क केला असता भिगवण येथे दवाखान्यात अॅडमिट असल्याचे व टँकर भिगवणजवळ असल्याचे खोटे सांगितले. शर्मा याने माहिती काढून हा टँकर ओनी गावच्या पुढे सरदार यांच्या ढाब्यासमोर उभा असल्याचे कळविले असता यातील तक्रारदार यांनी पुरोषात्तम शर्मा यास हैदराबाद येथे घेऊन जाण्यास सांगितले. या टँकरचे उमरगा येथील चेक पोस्टवर वजन माप केले असता त्यामध्ये २० टन लिक्विड ऐवजी ७ टन माल असल्याचे दिसून आले. त्या नंतर या बाबत इंदापूर पोलीस स्टेशनला चालक सूरज शंकरसिंग बघेल (रा. निलवड, भोपाळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, पोलीस कर्मचारी दत्तात्रय गिरमकर, संजय जगदाळे, महेश गायकवाड, निलेश कदम, राजू मोमीन, पोपट गायकवाड, सुभाष राऊत यांनी कारवाई केली.
टँकरमधील केमिकल चोरणारे जेरबंद; १४ लाख ९ हजारांचा माल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 3:39 PM