पुणे : मामलेदार कचेरी बंद असताना रेकाॅर्ड रुमचा लोखंडी दरवाजा तोडून आत प्रवेश करुन चोरी करण्याचा प्रयत्न केलेल्या घरफोड्यास खडक पोलिसांनी अटक केली आहे.
आकाश ऊर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे (वय २४, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे त्याचे नाव आहे.
मामलेदार कचेरीमधील भूमापन कार्यालय ४ ते ५ जानेवारीदरम्यान बंद असताना चोरट्याने रेकॉर्ड रुमचे लोखंडी दरवाजा तोडून त्यावाटे प्रवेश करुन चोरी करण्याचा प्रयत्न केला होता.
या गुन्ह्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना पोलीस अंमलदार रवी लोखंडे यांना माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश पाटोळे याने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासात शुक्रवार पेठ व टिंबर मार्केट येथील प्लायवूडचे दुकानांमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १५ हजार २०० रुपये रोख, दोन चांदीचे कॉईन व गुन्हा करण्यासाठी वापरलेला लोखंडी रॉड असा माल जप्त केला आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी सांगितले की, पाटोळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात १३, समर्थ पोलीस ठाण्यात ३ असे १६ गुन्हे दाखल आहेत. ३ घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये त्याला एक वर्षाची शिक्षा झालेली होती.
ही कामगिरी तपास पथकाचे सहायक निरीक्षक सुशील बोबडे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम मिसाळ, पोलीस अंमलदार अजिज बेग, फहिम सय्यद, गणेश सातपुते, संदीप पाटील, अमेय रसाळ, सागर केकाण, अनिकेत बाबर, समीर माळवदकर, बंटी कांबळे, राहुल मोरे, रवी लोखंडे यांच्या पथकाने केली.