पुणे : रेल्वे प्रवासी वकिलाकडील ऐवज असलेली पिशवी लांबविणा-या चोरट्याला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सोन्याची लगड, मोबाइल संच असा पावणेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
योगेश रमेश माने (वय २७,रा. गौतमनगर, दौंड, जि. पुणे) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. जबलपूर ते पुणे दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका वकिलाकडील ऐवज असलेली पिशवी लांबविण्याची घटना घडली होती. पिशवीत सोन्याचे दागिने आणि मोबाइल संच असा ऐवज होता. याप्रकरणाचा लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास करण्यात येत होता. तपासात सराईत चोरटा माने याने प्रवाशांकडील ऐवज लांबविल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला सापळा लावून पकडले. त्याच्याकडून १४० ग्रॅम सोन्याची लगड, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त केला. माने याच्याविरोधात यापूर्वी पुणे, अहमदनगर तसेच दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील, अतिरिक्त अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय आधिकारी श्रीकांत क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मौला सय्यद, सहाय्यक निरीक्षक बी. एस. अंतरकर, वाय. एस. कलकुटणे, दांगट, मदे, भोसले, थोरात आदींनी ही कारवाई केली. चोरट्याकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल तक्रारदार वकिलांना नुकताच देण्यात आला.