पुणे : गेल्या काही दिवसात एटीएममधून पैसे काढण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना हेरुन त्यांच्या नकळत पिन चोरुन त्याद्वारे खात्यातून पैसे काढण्याच्या प्रकारात वाढ झाली होती. त्याचा तपास करीत असताना चतु:श्रृंगी पोलिसांना आरोपीची माहिती मिळाली व तो त्याच एटीएम सेंटरमध्ये येत असल्याचे समजले. त्यानुसार त्यांनी तेथील रखवालदाराला सावध केले. सर्व माहिती दिली. त्यानंतर तो नेहमीप्रमाणे पुन्हा त्याच एटीएम सेंटरमध्ये आला. रखवालदाराने त्याला आत जात असल्याचे पाहिल्यावर तातडीने बाहेरुन कुलूप लावले आणि चोरटा एटीएममध्ये लॉक झाला. पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेत त्या सराईताला पकडले. हा ड्रामा औंधच्या डी पी रोडवरील कल्पतरु बिल्डिंगमधील युनियन बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये मंगळवारी घडला.
दीपक राजेंद्र सोनी (वय ३०, रा़ सरानी मार्ग, छतरपूर, मध्य प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापक रुपी सिंग यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. युनियन बँकेच्या एक महिला खातेदार १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता कल्पतरु बिल्डिंगमधील एटीएम सेंटरला पैसे काढायला आल्या होत्या. त्यांनी एका सीआर मशीनमधून पैसे काढण्यासाठी कार्ड स्वाईप केल्यावर आरोपीने त्यांना ते मशीन खराब आहे, शेजारील दुसऱ्या एटीएम मशीनमधून पैसे काढा असे सांगितले. त्याच्या सांगण्यानुसार त्या ज्येष्ठ महिलेने दुसऱ्या मशीनमध्ये कार्ड पुन्हा स्वाईप करुन पैसे काढू लागल्या. तेव्हा त्याने चोरुन त्यांचा पिन क्रमांक पाहिला व त्या गेल्यावर मुळ सीआरएम मशीनमध्ये त्या खातेदार महिलेने कार्ड वापरले होते. त्या मशीनमध्ये त्यांचा पिन वापरुन त्यांच्या खात्यातून ६ हजार ५०० रुपये काढून घेतले़ याची तक्रार चतु:श्रृंगी पोलिसांकडे आली.
पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी सांगितले की, या सेंटरमधील सीसीटीव्हीच्या आधारे आम्ही संशयिताचा फोटो मिळविला. तो तेथे असलेल्या रखवालदाराला दाखविल्यावर त्याने तो ओळखला व हा संशयित ४ - ५ दिवसात एकदा तरी येथे येत असल्याची माहिती दिली. त्यावर त्याला पोलीस ठाण्याचा व बँकेचे मोबाईल नंबर दिले़ हा आरोपी आल्यावर त्याने एटीएम सेंटरला बाहेरुन कुलूप लावावे व तातडीने पोलिसांना फोन करायला सांगितला होता़. त्यानुसार दीपक सोनी १८ ऑगस्टला नेहमीप्रमाणे एटीएम सेंटरमध्ये आला व आमच्या सापळ्यात अडकला.