पुणे : लोहमार्ग पोलीस ठाण्यातील कर्मचा-याला पैसे काढताना मदत करण्याचा बहाणा करुन चोरट्याने त्यांच्याकडील एटीएम कार्ड बदली करून परस्पर ८० हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.मोहमद अझरुद्दीन महागामी (वय२३, रा़ सोलापूर) असे त्याचे नाव आहे़ याप्रकरणी पोलीस नाईक अशोक किसन सातव यांनी फिर्याद दिली होती़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, अशोक सातव हे पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील एका एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांना पैसे न निघाल्याने एकाने त्यांना मदत करण्याचा बहाणा करून पिन क्रमांक विचारला व त्यांना पैसे काढून देत असल्याचा बहाणा करून त्यांचे एटीएम कार्ड बदलून त्यांना दुसरे कार्ड दिले. काही वेळाने दुस-या एटीएमवरून त्याने ८० हजार रुपये काढून घेतले. सातव यांना मोबाईलवर तसा संदेश आल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली़या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी परिसरातील एटीएम सेंटरमधील फुटेजवरून आरोपीचा फोटो मिळविला. त्याचा शोध सुरू केला, त्या वेळी आरोपी ढोले पाटील रोडवर असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मोहमद महागामी याला पकडले. त्याच्याकडून सातव यांचे ८० हजार रुपये हस्तगत केले, त्याने अशाप्रकारे आणखी दोन गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून, एकूण ३ गुन्ह्यांमधील ९० हजार रुपये त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ़ प्रभाकर बुधवंत, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय अधिकारी नंदकुमार घोरपडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हिंमत माने पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल पासंगे, हवालदार सुरेश जाधव, पोलीस शिपाई नीलेश बिडकर, अनिल जुंदरे, संजीव हासे, सिद्धार्थ वाघमारे यांनी केली.
पुण्यात चोरट्याने पोलिसालाच गंडवलं , 80 हजाराची हातचलाखी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2018 7:31 AM