पुणे : मार्केट यार्डातील फळ विभागात चोरी करणाऱ्याला रात्री गस्त घालताना माजी सैनिकांच्या पथकाने पकडले. तसेच पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मागील काही काळात भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले होते. फळ, भाजीपाला विभागात वारंवार चोरीच्या घटना घडत होत्या. याबाबत जून महिन्यात तीन-चार तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने सकाळ, दुपार आणि रात्रीच्या तीन शिफ्टमध्ये ६१ माजी सैनिकांची नियुक्ती केली आहे. ते आता नियमित गस्त घालत आहेत.
बाजार बंद झाल्यापासून (दुपारी २) दुसऱ्या दिवशी पहाटे तीनपर्यंत माजी सैनिक गस्त घालत आहेत. सोमवारी रात्री गस्त घालत असताना चोरी करून चाललेल्या व्यक्तीला पकडण्यात पथकाला यश आले आहे. चोऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे. यंत्रणा अलर्ट आहे. पथकाने पकडलेल्या त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.