लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : तब्बल ८४ तोळ्यांची सोनसाखळी चोरणारा चोर सापडला, पण याबाबत कोणी फिर्यादच दिली नसल्याने पोलिसांवर मालकाचा शोध घेण्याची वेळ आली आहे. नरेश शिंदे (वय २३, रा. फुगेवाडी) याला गुन्हे शोखेच्या युनिट ३ ने अटक केली. त्याच्याकडून सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ही सोनसाखळी आहे. त्याने खडकी रेल्वे स्टेशनसमोरील जयहिंद टॉकीज येथून सहा महिन्यांपूर्वी ही साखळी चोरली होती. मात्र, चेन गहाळ होऊनही अद्याप कुणीही तक्रार नोंदविण्यास आलेले नाही. शिंदे याने ही साखळी विकण्याचा प्रयत्नही केला. मात्र, कोणी विकतही घेतली नाही. सोनसाखळीमालकाने मालकी हक्काबाबतचे पुरावे सोबत घेऊन युनिट ३ गुन्हे शाखा रेंजहिल्स खडकी कार्यालय येथे संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त (गुन्हे) पंकज डहाणे यांनी केले आहे.गेल्या आठ दिवसांमध्ये २ जबरी चोरी, १ घरफोडी आणि विनयभंग असे चार गुन्हे उघडकीस आणून पाच आरोपींना पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनला यश मिळाल्याची माहिती डहाणे यांनी दिली. कोरेगाव मधील एटीएममध्ये जबरी चोरी केल्याप्रकरणी प्रतीक गायकवाड (वय २७, रा. ताडीवाला रस्ता) याला अटक केली आहे. मोबाईल चोरीच्या घटनेत गणेश आदिनाथ लोखंडे (वय २३, रा. आंबिलवाडा) या अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
चोर सापडला, मालकाचा शोध
By admin | Published: June 03, 2017 2:53 AM