पुणे : पुण्यातील एका नामांकित कंपनीच्या कार्यालयात अकाऊंट विभागात काम करणाऱ्या व्यक्तीला संपर्क करुन एका सायबर चोरट्याने फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. कंपनीचा संचालक बाेलत असल्याचे सांगून विश्वास संपादन करुन खात्यावर ऑनलाईन ६६ लाख ४१ हजार रुपये पाठवले होते. याप्रकरणी पुणे सायबर पाेलीसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करुन बिहारमध्ये जाऊन सायबर चोरट्याला जेरबंद केले.
बिशाल कुमार भरत मांझी (वय- २१, रा.लकरीखुर्द, सिवान, बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याने तक्रारदार यांना फाेन करुन नामांकित कंपनी इन्फिनिटी डेवर्ल्पस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक बाेलत असल्याचे भासवले. त्याद्वारे तक्रारदार यांचे कंपनीच्या खात्यातून तीन बँक खात्यावर एकूण ६६ लाख ४१ हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले.
सदर गुन्हयातील आरोपीने गुन्हा करताना वापरलेले माेबाईल क्रमांक, ईमेल आयडी व पेमेंट करण्यासाठी दिलेल्या लिंकचा व वेगवेगळ्या बँक खात्यांचा तांत्रिक तपास करुन त्याचा ठावठिकाणा शाेधून काढला. आरोपी बिहार राज्यात सिवान परिसरात राहत असल्याची माहिती निष्पन्न झाल्यावर सायबर पाेलीस पुणे यांचे एक पथक बिहार मध्ये जाऊन आराेपीचा शाेध घेऊन त्याला अटक केली. सदर आराेपींकडून पाेलीसांनी एक माेबाईल, वेगवेगळे सहा सिमकार्ड हस्तगत केले आहे.