लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरेगाव पार्कमधील बोट क्लबमधील सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये एक लिफाफा देण्यासाठी चौघे जण शिरले़ पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमधील ज्येष्ठ वकिलांनी दरवाजा उघडला. पण समोर चौघे जण आणि एक लिफाफा देण्यासाठी आले. शिवाय त्यावर कोणाचे नावही नाही, हे पहाताच त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली़ त्यांनी आपल्या परिचयाच्या केटरिंगवाल्याला फोन लावण्यासाठी पत्नीला आवाज दिला. हे ऐकल्यावर चौघेही गडबडून गेले व त्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर सोसायटीतील सीसीटीव्ही पाहिल्यावर आपण एका मोठ्या होऊ घातलेल्या गुन्ह्यातून वाचल्याचे या वकिलांच्या लक्षात आले.
बोट क्लब रोडवरील लिमिराज सोसायटीत हा प्रकार ८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता घडला. या प्रकरणी एका ज्येष्ठ वकिलांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबतची माहिती अशी, हे वकील दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात गेली ३० वर्षे प्रॅक्टिस करतात. सध्या कोर्ट बंद असल्याने ते पुण्यात राहायला आले आहेत. या सोसायटीत प्रत्येक मजल्यावर एकच फ्लॅट असून लिफ्टचा दरवाजा थेट फ्लॅटमध्ये उघडतो. त्यांच्याकडे अनेक पक्षकारांचे जाणे-येणे असते. ८ मे रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास चौघे जण आले. त्यांनी दरवाजा उघडल्यावर त्यांनी एक लिफाफा दिला. त्यावर कोणी पाठविला, त्यांचे नाव नव्हते. म्हणून त्यांनी विचारणा केल्यावर त्यातील एकाने उर्मटपणे केटरिंगवाल्याकडून आल्याचे सांगितले. त्याचवेळी त्यांच्या हालचाली पाहून या वकिलांना संशय आला. तेवढ्यात एकाने ‘अंकल एक ग्लास पाणी मिलेगा क्या?’ अशी विचारणा करीत घरात प्रवेश केला. एक केटरिंगवाला आपल्या परिचयाचा आहे, असे म्हणून त्यांनी मोठ्यांनी त्याला फोन करण्यास पत्नीला सांगितले. त्यामुळे ते चौघे गडबडून गेले. त्यांच्यातील एकाने लिफ्ट थांबवून ठेवली होती. त्यातून ते घाईघाईने बसून पळून गेले. त्यांनी लिफाफा उघडून पाहिल्यावर त्यात कोरी पाने होती.
त्यानंतर त्यांनी सोसायटीतील सीसीटीव्ही तपासले तर त्यात दोघे जण अगोदर आले होते. त्यानंतर काही वेळाने दोघे आल्याचे दिसून आले. काही तरी कट करून ते त्यांच्याकडे अल्याचे लक्षात आले.
सोसायटीतील इतर सभासदांशी त्यांनी संपर्क साधल्यावर अशाच प्रकारे या महिन्यात दोन ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचे लक्षात आले. आपण थोडे जरी बेसावध असतो तर लुटमारीपासून काहीही प्रकार घडू शकला असता हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने कोरेगाव पार्क पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला.