सकाळच्या पाऊण तासात घरफोडी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून, नागरिकांना आपल्या मालमत्तेचे सरंक्षण कसे करावे? हेच कळेनासे झाले आहे. घरातून बाहेर पडताना एक दागिना, मंगळसूत्र घालून गेले, तर मोटारसायकलवरून येणारे चोरटे ते कधी हिसकावून नेतील याचा नेम नाही. थोड्या वेळासाठी बाहेर गेले, तरी चोरटे कधी घर फोडून लुटून नेतील याचा भरवसा राहिलेला नाही. हडपसरमधील एका महिलेला शुक्रवारी सकाळी हा अनुभव आला. अवघ्या ४० मिनिटांच्या अवधीत चोरट्यांनी त्यांचे घर फोडल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणी एका ३० वर्षांच्या महिलेने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या महिला गोसावीवस्तीत राहतात. त्या मॉर्निंग वॉकसाठी शुक्रवारी सकाळी ६ वाजता घराला कुलूप लावून बाहेर पडल्या. सुमारे ४० मिनिटांनी त्या घरी परत आल्या. तोपर्यंतच्या काळात चोरट्याने घराचे कुलूप तोडून १४ हजार ५०० रुपयांचे ८ ग्रॅम ९८० मिलिग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
शुक्रवारी दिवसभरात शहरात तीन ठिकाणी घरफोडीच्या घटनांचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवणे येथील महिला कुटुंबासह मुळशी येथे गेल्या असताना चोरट्यांनी फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून ४८ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. त्यांनी उत्तमनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
उरुळी देवाची येथील बंगल्याच्या किचनची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व १ लाख ४३ हजार ५०० रुपयांचे ४६ ग्रॅम वजनाचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी पारस छाजेड (वय ५५, रा. गुरुकृपा बंगला, उरुळी देवाची) यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
......
शहरातील घरफोडीच्या घटना
सप्टेंबर २०२० अखेर - २२२
ऑगस्ट २०२१ अखेर - २६२
१७ सप्टेंबर २०२१ अखेर - २८३