पुणे : कस्टमचा मोबाईल, लॅपटॉप, घड्याळ विकण्याचा बहाणा करून त्याऐवजी वीट, छोटा पाऊच देऊन फसवणूक करणाऱ्या दोघा आंतरराज्य चोरट्यांना चंदननगर पोलिसांनी अटक केली. ते फसवणूक करण्यासाठी चक्क विमानाने येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. इक्राम सुलेमान मलिक (वय ३९) आणि अल्लाउद्दीन अलीमउद्दीन मलिक (वय ३७, दोघेही रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
चंदननगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गजानन जाधव हे सहकाऱ्यांसह गस्त घालत असतना खराडी भागात दोघे जण कस्टममधून विकत घेतलेला मोबाईल विकण्यासाठी फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, त्यांचा शोध घेण्यात येत होता. अशाच प्रकारे चंदननगर पोलीस ठाण्यात कस्टमच्या नावाखाली मोबाईल, लॅपटॉप, घड्याळ दाखवून त्यापोटी ६० हजार रुपये घेऊन त्याला एका बॅगेत विट व छोटा पाऊच, त्यामध्ये काच अशी बॅग देऊन फसवणूक केली होती. याचा तपास करताना एका लॉजजवळ या संशयितांनी स्कूटर पार्क केल्याचे आढळून आले होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी विमानतळ परिसरातही एकाची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
फसवणूक करण्यासाठी ते दिल्लीहून विमानाने येत असत. एखाद्या लॉजमध्ये उतरून लाेकांना फसवून ते पळ काढत असत. त्यांच्याकडून महागडे ३ मोबाईल, १ लॅपटॉप, १ घड्याळ व काळ्या बॅगा असा ३ लाख ८५ हजार ६५० रुपयांचा माल जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जाधव, सुनिल थोपटे, सहायक निरीक्षक गजानन जाधव, पोलीस अंमलदार अमित कांबळे, सुभाष आव्हाड, राहुल इंगळे, नामदेव गडदरे, अतुल जाधव, महेश नाणेकर, संदीप येळे, श्रीकांत शेंडे, गणेश हांडगर, शकुर पठाण, तुषार भिवरकर, युसुफ पठाण यांनी केली.