राजगुरुनगर: गारगोटवाडी (ता खेड ) येथे मंदिराचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी देवाचे चांदीचे दागिने लांबविले. तसेच घनवट (ता खेड ) येथेही चोरट्यांनी मंदिरात प्रवेश देवाची चांदीची मूर्ती व मुखवटा लांबविला. या दोन्ही घटनेत सुमारे १ लाख १४ हजाराचा ऐवज चोरीला गेला आहे.ही घटना गुरुवारी (दि २ ) रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. याबाबत अतुल ज्ञानेश्वर गारगोटे (रा. गारगोटवाडी,ता. खेड ) यांनी खेड पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गारगोटवाडी येथे ग्रामपंचायत समोर मारुती मंदिर आहे. या मंदिरात मारूती देवाची मूर्ती व शंकराची पिंड आहे .पिंडीशेजारी भैरवनाथ देवाचे दोन मुखवटे होते. मंदिरात भाऊ गेणू गारगोटे हे पुजारी म्हणून काम पाहतात. सकाळी व संध्याकाळी देवाच्या पुजेसाठी ते मंदिर उघडतात. शुक्रवारी (दि २) नेहमीप्रमाणे त्यांनी मंदिर बंद केले होते. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाच्या कडी-कोयंडा कापून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून भैरवनाथ देवाचे सव्वादोन किलोचे ७० हजार रुपये किमतीचे चांदीचे दोन मुखवटे चोरट्यांनी लांबविले. दुसऱ्या दिवशी पुजारी गारगोटे हे मंदिरात पुजा करण्यासाठी गेले असता चोरीचा घटनासमोर आली. त्याच रात्री या परिसरातील १० किलोमीटर अंतरावर घनवटवाडी ( ता खेड ) येथे माथोबा देवाचे मंदिर आहे. या मंदिराचा दरवाजा उघडा होता. ही संधी चोरट्यांनी साधुन मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून माथोबा देवाची पाव किलो चांदीची मूर्ती किंमत १० हजार रुपये ,तसेच देवाचा मुखवटा किंमत ३४ हजार रुपये असा एकूण १ लाख ३४ हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक राहूल लाड करत आहे.