लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : चोरट्यांनी विद्युत रोहित्रामधील ऑईल व तांब्याची कॉईल असा एकूण ५४ हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला असल्याची घटना पूर्व हवेेेलीत घडली आहे.
याप्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित मुळशी विभाग नायगाव शाखा उरूळी कांचनचे वरिष्ठ तंत्रज्ञ अंचल प्रकाश बागडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार ही चोरी मंगळवारी (२९ जून) रात्री १ ते सकाळी ८ च्या दरम्यान घडली आहे.
२९ जुन रोजी सकाळी आठच्या सुमारास नायगाव कुंजीरवाडी रोड, कवडे नर्सरीजवळ, शफिभाई पापाभाई मुलाणी यांच्या शेतात बसवण्यात आलेल्या रोहित्राजवळ राहणारे विकास चौधरी (रा. नायगाव, ता. हवेली ) यांनी बगाडे यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधून रोहित्र चोरट्यांनी फोडल्याचे सांगितले. बगाडे यांनी स्वतः घटनास्थळावर जाऊन खात्री केली असता त्यांना रोहित्रामधील तांबे आणि ऑईल चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसले. ही बाब वरिष्ठ असिस्टंट इंजिनिअर नईम सुतार यांना सांगितली. त्यांनी पाहणी केली असता १४ हजार रुपयांचे ऑईल व ४० हजार रुपये किमतीची ८० किलो वजनाची तांब्याची कॉईल असा एकूण ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी गेल्याचे दिसून आले आहे.