वाघोली : पीएमपीच्या वाघोली-हडपसर मार्गावरील बसमधे चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे पाकीट चोरटे लंपास करीत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, हडपसर बस स्थानकावर सर्वाधिक प्रकार आढळून येत आहेत. सातत्याने प्रवाशांचे पाकीट चोरीला जात असल्याचे बसचे वाहक-चालकच सांगत आहेत. अशा घटनांमुळे वाघोलीतील प्रवासी मात्र त्रस्त झाले आहेत.हडपसर बस स्थानकावर झालेल्या चोऱ्यांचे लोण वाघोलीपर्यंत पोहोचले आहे. या बसमध्ये गर्दी असल्याने चोरट्यांचे चांगलेच फावत असून, प्रवासी मात्र चोऱ्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे अक्षरश: वैतागले आहेत. प्रवास करीत असताना सोबत साहित्य घेऊन जाताना प्रवाशांना अत्यंत काळजीपूर्वक प्रवास करावा लागत आहे. या चोरट्यांच्या टोळीला पोलिसांनी वेळीच आवर घालून जेरबंद करावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. हडपसर स्थानकावरून सोमवारी सायंकाळी पाकीट चोरीला गेलेले प्रवासी संतोष वाघुले यांनी सांगितले, की सायंकाळी साडेसहा वाजता उस्मानाबादहून हडपसर येथे उतरल्यानंतर वाघोली-हडपसर बसमधून जाण्याकरिता बस स्थानकावर थांबलो असताना वाघोलीला जाण्याकरिता बस स्थानकावर आली. बसमध्ये बसण्यासाठी सर्वच प्रवासी गर्दी करून बसमध्ये चढत होते. हातामध्ये पिशव्या घेऊन चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने पाकीट लंपास केले. पाकीट चोरीला गेले असल्याचे तत्काळ लक्षात आले असले, तरी गर्दी असल्यामुळे आरडाओरडा करूनही चोरटा सापडला नाही. सगळेच प्रवासी चढल्याने चोरटादेखील बसमध्ये चढला असण्याची शक्यता होती.वाघुले यांनी तत्काळ हडपसर येथील मित्राशी संपर्क साधून पाकिटात असलेले नवीन एटीएम ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एटीएम नवीन असल्याने पिन नंबरदेखील पाकिटातच सापडल्याने चोरट्यांनी अर्ध्या तासानंतर नऊ हजार रुपयेदेखील काढून घेतले. चोरीच्या घटनेबाबत हडपसर पोलिसांत तक्रार अर्ज दिला असून त्याबाबत पोलीस तपास करीत आहेत. वाघुले यांना आलेला अनुभव त्यांनी वाहक आणि चालकांना बोलून दाखविला असता चोरीचे प्रकार दररोजच घडत असल्याचे त्यांनी सांगितले. चोरट्यांच्या सुळसुळाटामुळे वाघोलीतील प्रवासी मात्र त्रस्त झाले आहेत.(वार्ताहर)रांगेने प्रवासी सोडावेतवाघोलीला जाण्याकरिता हडपसर स्थानकावर बसची वाट पाहत असताना अचानक बस आल्यानंतर सर्वच प्रवासी गर्दी करून बसमध्ये चढतात. याचाच फायदा चोरटे घेऊन प्रवाशांचे पाकीट, साहित्य लंपास करतात. गर्दी असल्यामुळे चोरी झाल्याचे लक्षातही येत नाही. बसमधे प्रवाशांना शिस्तबद्धरीत्या रांगेतून सोडले गेले, तर चोरीच्या घटनांना आळा बसेले. यासाठी पीएमपीच्या प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.हडपसर स्थानकावरून पाकीट चोरीला जाण्याच्या प्रकाराला मी एकटाच बळी पडलेलो नाही. माझ्यासारखे अनेक जण आहेत. या टोळीचा पर्दाफाश होणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रवाशांना बिनदिक्कत प्रवास करणे सोपे जाईल. त्याचबरोबर चोरट्यांना आळा घालण्यासाठी संपूर्ण स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरेदेखील पीएमपीने लावणे गरजेचे आहे.- संतोष वाघुले, प्रवासी
बसमध्ये चोरांचा सुळसुळाट
By admin | Published: May 18, 2016 1:08 AM