पुणे : शहरात वाहनचोरीचे प्रकार वारंवार घडत असताना, आता तर चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिले आहे. वाहन चोरांनी सर्वसामान्य नागरिकांसह पोलिसांचीच वाहने चोरी करण्याचे धाडस दाखवले. ही वाहने थेट पोलिस आयुक्तालयासमोरून चोरीला गेली आहेत. यामुळे वाहन चोरांना आता पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मतदान प्रक्रियेच्या कालावधीत पोलिस प्रशासन गुंतलेले असताना चोरट्यांनी पोलिस आयुक्तालयासमोरील पार्किंगमधून तीन दुचाकी लंपास केल्या आहेत. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची महिती आहे. १२ ते १४ मे या कालावधीत ही वाहने चोरीला गेल्याचे समजते.
शहरात मागील सव्वातीन वर्षांत शहरातून २४ कोटी ६८ लाखांची ५ हजार ८२२ वाहने चोरीला गेली आहेत. त्यात दुचाकी, रिक्षा आणि चारचाकींचा समावेश आहे. शहरभर सीसीटीव्हीचे जाळे असूनही, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हे वाहन चोरटेही सापडत नाहीत आणि चोरीची वाहनेही मिळत नाहीत. पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी ही वाहने चोरी करण्याचे धाडस करून दाखवले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने वाहनचोऱ्या रोखण्याचे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे. गेल्या काही वर्षापासून वाहनचोरी ही पुणे पोलिसांसमोरील खऱ्या अर्थाने डोकेदुखी ठरत आहे. मात्र आता पोलिस आयुक्तालयासमोर पार्क केलेली वाहने देखील सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे.
या वर्षाच्या सुरुवातीपासूनच चोरांनी वाहन चोरीचा धडाका लावल्याचे दिसून आले आहे. सुरुवातीच्या अवघ्या अडीच महिन्याच्या कालावधीतच चोरट्यांनी तब्बल ४०० वाहने चोरी केली आहेत. त्यामुळे शहरातील वाहन चोरींची तीव्रता किती मोठी आहे?, हे दिसून येते. दिवसाला शहरातून सहा ते सात वाहने चोरीला जात आहेत. कधी-कधी हेच प्रमाण नऊ ते दहाच्या घरात असते. वाहन चोरांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना म्हणावे, तसे यश येत नसल्यामुळे सर्वसामान्य नागिरकांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागतो आहे.