पुणे : डोळ्यांमध्ये मिरचीची पूड टाकून नागरिकांना लुटणारी सहा जणांची टोळी गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने जेरबंद केली आहे. निर्मनुष्य भागात एकट्याने जात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ही टोळी लक्ष्य करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे आणि सहायक आयुक्त समीर शेख यांनी दिली. या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे.प्रदीप ऊर्फ पद्या अदिनाथ गायकवाड (वय २९, रा. सिंहगड रोड), योगेश जालिंदर आल्हाट (वय २९), सूरज ऊर्फ टिल्या अशोक म्हस्के (वय २३, रा. पानमळा वसाहत, सिंहगड रोड), अक्षय राम गायकवाड (वय २२), आनंद ऊर्फ सिद्धू कदम (वय १९) आणि करण अंकुश जानराव (वय १९, रा. दांडेकर पूल) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात डोळ्यांत मिरचीपूड टाकून नागरिकांच्या गळ्यातील ऐवज हिसकावण्यात आल्याच्या तीन घटना घडल्या होत्या. याचदरम्यान खडक परिसरातही एका व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांच्या डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करण्यात आली होती. त्यांची रोकड आणि मोबाईल व्हाऊचर घेऊन आरोपी पसार झाले होते.या घटनांसंदर्भात तातडीने तपास करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिल्या होत्या. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींचा माग काढायला सुरुवात केली होती.युनिट १ चे कर्मचारी तुषार खडके व रिजवान जिनेडी यांना आरोपींबाबत खबºयाने माहिती दिली. वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले पाटील व त्यांच्या पथकाने सापळा रचून या सहा जणांना गजाआड केले. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ चे वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले-पाटील, सहायक निरीक्षक धनंजय कापरे, उपनिरीक्षक दिनेश पाटील, हर्षल कदम व कर्मचारी श्रीकांत वाघवले यांच्यासह पथकाने केली.व्यावसायिकांला लुटण्यासाठी कटआरोपींनी व्यावसायिकाला लुटण्यासाठी प्लॅन आखला होता. पद्या आणि आल्हाट दहा दिवसांपूर्वी त्यांच्या दुकानात गेले. मोबाईल व्हाऊचर घेण्याच्या बहाण्याने संपूर्ण माहिती घेऊन आले. तर, टिल्या म्हस्के व जानराव या दोघांनी पाळत ठेवण्याचे काम केले. हा व्यावसायिक दुकानातून बाहेर पडताच त्यांच्या घरासमोर थांबलेल्या अक्षय गायकवाड याला माहिती देण्यात आली. त्यांना गेटवरच अडविण्यात आले. काही कळायच्या आतच त्यांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून बॅग लंपास करण्यात आली होती.आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सिद्धू कदम याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहेत. तर, अक्षय गायकवाडवर दत्तावाडीत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. जानराव याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल आहे.
डोळ्यांत मिरचीपूड टाकून लुटणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 3:32 AM