राजगुरुनगर : गेल्या काही दिवसांपासून कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी कांदा चोरीवर आपले लक्ष केंद्रीत केले असून खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील एका शेतकऱ्याचा २५ ते ३० पिशव्या कांदा चोरट्यांनी चोरून नेला आहे. या शेतकऱ्याच्या सुमारे ७० हजाराचे नुकसान झाले असुन कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.राजगुरुनगर शहरालगत असणाऱ्या राक्षेवाडी येथील शेतकरी महेश राक्षे यांनी आपल्या मालकीच्या शेतात वीस गुंठ्यात कांदा पिक घेतले होते. कांदा पिक जोरात येऊन त्याची काढणी केली होती. काढलेला कांदा शेतात आरण लावून ठेवला होता. दोन दिवसात काढलेल्या कांद्याची बाजारात विक्री करणार होते. दि. २८ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेतातील आरणीतून सुमारे २५ ते २० पिशवी कांदा चोरून नेला. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकरी राक्षे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना कांदा अरणीतुन चोरी झालेचे निदर्शनास आले.