लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील विविध भागात तीन घरफोड्यात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोकड असा ६ लाख ६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चतु:श्रृंगी व दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिवाजीनगर परिसरातील दीप बंगला चौकात असणाऱ्या महाराजा वाईन्सचे शटर उचकटून चोरट्यांनी २ लाख ८० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी रवी जितेंद्र सरोदे (वय २१, रा. दारुवाला पूल, नाना पेठ) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत वाईनचे मॅनेजर कश्यप रवासीय यांनी फिर्याद दिली आहे. कश्यप हे सोमवारी रात्री दुकान बंद करून गेल्यानंतर चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला. तिजोरी व गल्ल्यातील २ लाख ८० हजार रुपये चोरून नेले. हा सर्व प्रकार दुकानात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. तोंडाला मास्क लावलेल्या ४ चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केल्याचे त्यात दिसून येत होते. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
पर्वती दर्शन परिसरातील अनिकेत खुडे ऊर्फ शायना गुरू यांच्या बंद फ्लॅटमध्ये शिरून चोरट्यांनी २ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
जनता वसाहतीतील एका घराच्या उघड्या दरवाजावाटे आत प्रवेश करून चोरट्यांनी कॉटवर ठेवलेली पर्स चोरून नेली. त्यामध्ये ५ हजार रुपये रोख, १ लाख ८० हजार रुपयांचे ४ तोळ्याचे सोन्याचे दागिने असा १ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज होता.