पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील एका इंग्लिश मीडियम स्कूलमधील चार अल्पवयीन मुलांना वाहनचोरी प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही मुले नववी व दहावीमधील आहेत. सर्वांचे वडील व्यावसायिक असून, ही मुले संपन्न घरातील आहेत. आर्थिक स्थिती चांगली असूनही ती चोरी करीत होती. त्यांनी डीएसएलआर कॅमेरे, महागड्या सायकल, संगणकाचे मदर बोर्ड, रॅम चोरल्याचेही उघड झाले आहेशुक्रवारी दुपारी १२ च्या दरम्यान पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अमेय रसाळ, महेंद्र जाधव आदींना माहिती मिळाली की, कसबा पेठेतील एका हायस्कूलच्या बाहेर रोडवर पार्किंगमधे दोन दुचाकी एकसारखे नंबर असलेल्या उभ्या आहेत. त्या गाड्या घेण्यासाठी शाळकरी मुले आल्यानंतर, पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी करून स्कूटरच्या डिकीची तपासणी केली असता कॅमेरा सापडला. मुलांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी फरासखाना आणि विश्रामबाग ठाण्याच्या हद्दीतून एकूण ३ दुचाकी चोरल्याचे दिसून आले. आॅनलाइन माध्यमातून ते कॅमेरा विकणार होते. एकूण १ लाख ८७ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्यावर गुन्हा नोंदवून न्यायालयात हजर करण्यात आले. ही कामगिरी फरासखाना तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव, तसेच अमेय रसाळ, ज्ञानेश्वर देवकर, योगेश जगताप, इक्बाल शेख, संजय गायकवाड, बाबासाहेब गोरे, नाना भांदुर्गे, संदीप पाटील, शंकर कुंभार, अमोल सरडे, विकास बोराड, हर्षल शिंदे यांनी केली.
चैनीसाठी शालेय विद्यार्थ्यांकडून चोऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 3:27 AM