चाकण : एमआयडीसीमधील छोट्या-मोठ्या कंपन्यांमधील लाखो रुपयांचा माल चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यातील बहुतांश चोरट्यांना मुद्देमालासह पकडले जात असूनही चोरीच्या घटनांमध्ये घट होण्याचे प्रमाण कमी होत नाही. यामुळे पोलिसांनी रात्रगस्त वाढवावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांत घडणाऱ्या चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या अंतर्गत महाळुंगे पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये एमआयडीसीमधील जवळपास दोन ते तीन हजार लहान-मोठ्या कंपन्यांसह परिसरातील गावे महाळुंगे पोलीस चौकीत येतात. पोलिसांचे रात्रीचे पेट्रोलिंग सुरू असूनही मागील काही दिवसांपासून औद्योगिक वसाहतीच्या कंपन्यांमधील स्पेअर पार्टच्या लहान मोठ्या चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे कंपनी मालकांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे.
मागील दोन महिन्यांच्या कालावधीत चोरट्यांनी चाकण एमआयडीसीमधील अनेक कंपन्यांमधून लोखंडी, ॲल्युमिनिअम, पितळ, तांब्याच्या पट्ट्या, प्लेट आदी लाखो रुपयांचा कच्चा माल चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये कुरुळी येथील एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला धमकावून धाडसी दरोडा टाकण्यात आला होता. भांबोली येथील एटीएम केंद्राला बॉम्बसदृश वस्तूने उडवून मोठी रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. रोजच घडणाऱ्या लहान मोठ्या चोरीच्या घटनांमुळे कंपनी मालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तरीही चोरीच्या बहुतांश घटनांमधील चोरट्यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. परंतु रोजच घडणाऱ्या चोरीच्या घटना कमी झालेल्या दिसून येत नाही.
चोरी करणाऱ्यांमध्ये काम करणारे कामगारच जास्त संख्येने सहभागी असल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रत्येक सुरक्षारक्षक आणि कामगाराचे रेकॉर्ड ठेवणे, कंपनी आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे. पोलीस आणि कंपन्यांच्या सहकार्याने गस्ती पथके तयार करून रात्रीचे पेट्रोलिंग वाढवण्यात आले आहे.
-अरविंद पवार, पोलीस निरीक्षक महाळुंगे पोलीस चौकी
सततच्या लॉकडॉउनने अनेक लहान-मोठे उद्योजक मेटाकुटीला आले आहे. त्यात दररोजच्या घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे कंपनी मालकांमध्ये असुरक्षितेच वातावरण तयार झाले आहे. पोलिसांचे नाईट राउंड होऊनही चोऱ्या थांबत नाही. यासाठी पोलिसांनी आपले गोपनीय विभाग जास्त अलर्ट करणे गरजेचे आहे.
-दिलीप बटवाल, सचिव, इंडस्ट्रीयल फेडरेशन, चाकण