पुणे : रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी, काेपऱ्यांमध्ये थुंकलेलं आपण नेहमीच पाहत असताे. थुंकलेलं पाहून आपल्याला किळस वाटत असते परंतु थुंकणाऱ्यांना आपण थांबवत नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकलेलं पालिकेच्या कर्मचाऱ्यांना आपल्या हाताने साफ करावं लागतं. पुणे महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणेचा एक भाग म्हणून रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली हाेती. पुणे शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर माेळक आता नागरिकांना भावनिक आवाहन करत आहेत. माेळक यांनी आपल्या फेसबुकवाॅलवर थुंकलेलं साफ करत असलेल्या एका महिलेचा फाेटाे टाकला असून पुढच्या वेळेस थुकताना दहा वेळा विचार करा. कारण त्याची स्वच्छता कुणाचीतरी आईच करत असते. असे लिहीत नागरिकांना स्वच्छता राखण्यासाठी भावनिक आवाहन केले आहे.
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पुण्याला प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने माेठ्याप्रमाणावर पाऊले उचलण्यास सुरुवात केली हाेती. रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर तसेच उघड्यावर लघवी करणाऱ्यांवर पालिकेकडून कडक कारवाई करण्यास सुरुवात केली. आत्तापर्यंत पालिकेच्या घनकचरा विभागाकडून 8 हजार 500 नागरिकांवर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्याबद्दल कारवाई केली असून 20 लाख 25 हजार रुपये इतका दंड वसूल केला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2019 संपले असले तरी शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक असणारी सर्व पाऊले उचलणार असल्याचे माेळक यांनी लाेकमतशी बाेलताना सांगितले.
माेळक म्हणाले, स्वच्छ सर्वेक्षण 2019 संपले असले तरी आम्ही शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वाेताेपरी प्रयत्न करत आहाेत. मिशन 2020, व्हिजन 0 टू 100 हा नवीन उपक्रम आम्ही हातात घेतला असून शहराला भारतातील सर्वात स्वच्छ शहर करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. परंतु हे सर्व नागरिकांचा सहभाग आणि सहकार्याशिवाय शक्य नसल्याने नागरिकांना सुद्धा पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन आम्ही करत आहाेत.