पुणे : पोलीस नाहीत म्हणून सिग्नल तोडून जाताय, किंवा विरुद्ध दिशेने गाडी चालवताय आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपण पोलिसांना मामा बनवू तर नियम तोडण्याआधी पुन्हा एकदा विचार करा. कारण ६ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत नियम मोडून दंड न भरणाऱ्या ४४ हजार पाचशे १५ वाहनचालकांकडून १ कोटी ३७ लाख २१ हजार रुपये वसून करण्यात आले आहेत. पुण्यातील वाहनांची संख्या ही शहराच्या लोकसंख्येपेक्षा अधिक झाली आहे. आशिया खंडातील सर्वाधिक दुचाकी या पुण्यात आहेत. या वाढत्या वाहनसंख्येमुळे नियम मोडणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. अश्या नियम मोडणाऱ्यांना चाप बसविण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाय केले जातात. त्यात नियमित नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात येते. वाहतूक पोलिसांकडून ६ फेब्रुवारी ते १९ मार्च २०१८ या कालावधीत शहरात ठिकठिकाणी केलेल्या नाकाबंदी मध्ये ई-चलनाच्या माध्यमातून आकारण्यात आलेला दंड न भरलेल्या तसेच इतर दंड न भरलेल्या अश्या तब्बल ४४ हजार पाचशे १५ वाहनचालकांकडून दंड वसून करण्यात आला. हा दंड १ कोटी ३७ लाख २१ हजार शंभर इतका होता.
अनेकदा एखाद्या चौकामध्ये वाहतूक पोलीस नसल्यास काही वाहनचालक नियम मोडत असतात. मात्र शहरभर लावण्यात आलेल्या सीसीटिव्हीच्या माध्यमातून अश्या नियम मोडणाऱ्यांच्या मोबाईलवर ई-चलन पाठविण्यात येते. त्यामुळे तुम्हाला आपण नियम मोडला तरी कोणाला कळणार नाही असे वाटत असेल तर सीसीटिव्ही नावाचा तिसरा डोळा आपल्यावर लक्ष ठेवून आहे याचे भान ठेवा, अन्यथा आज न उदया तुम्हाला दंड हा भरावाच लागेल. याबाबत बोलताना वाहतूक उपायुक्त अशोक मोराळे म्हणाले, पोलिसांना कुठलेही टार्गेट नसते. वाहन चालक मोठ्याप्रमाणावर नियम मोडत असल्याने दंडाची रक्कमही मोठी होत असल्याचे आपल्याला दिसते. वाहनचालकांनी नियमांचे पालन केल्यास दंड वसूल करण्याचा प्रश्नच नाही. सिग्नलला पोलीस नाही म्हणून सिग्नल मोडू नये. वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळावी.