पुणे : शहरातील रस्त्यांवर पिचकाऱ्या मारणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाई केली जात असताना अाता महापालिकेच्या भिंती रंगवणाऱ्यांवर देखिल कठाेर कारवाई करण्यात येत अाहे. अाज पालिकेच्या भिंतींवर पिचकाऱ्या मारणाऱ्या 11 जणांवर पालिकेकडून कारवाई करण्यात अाली असून त्यांच्याकडून 1650 रुपये इतका दंड वसूल करण्यात अाला अाहे. ही कारवाई यापुढेही अशीच सुरु राहणार असल्याचे पालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त ज्ञानेश्वर माेळक यांनी सांगितले.
पुण्याला स्वच्छ पुणे सुंदर पुणे करण्यासाठी महानगरपालिकेकडून रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर 2 नाेव्हेंबर पासून कारवाई करण्यात येत अाहे. त्यानंतर रस्त्यावर कचरा टाकणारे तसेच रस्त्यावरच लघवी अाणि शाैचास बसणाऱ्यांवर देखिल कारवाईचा बगडा उचलण्यात अाला. असे असताना पालिकेच्या भिंती मात्र लाल रंगाने माखल्या हाेत्या. याबाबत लाेकमतने पाहणी करुन पालिकेतील अस्वच्छतेचे वास्तव मांडले हाेते. त्याची अाता दखल घेत महापालिकेच्या इमारतीत भिंतींवर थुंकणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात येत अाहे. अाज 11 जणांवर कारवाई करण्यात अाली असून त्यांच्याकडून 1650 रुपये इतका दंड वसूल करण्यात अाला अाहे. तसेच अाज रस्त्यावर थुंकणाऱ्या, कचरा टाकणाऱ्या, लघवी करणाऱ्या 135 लाेकांवर कारवाई करण्यात अाली असून त्यांच्याकडून तब्बल 32 हजार 400 इतका दंड वसूल करण्यात अाला अाहे.
माेळक म्हणाले, शहरातील रस्त्यांवर कारवाई करण्यात येत असून अाता पालिकेत अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर देखिल कारवाई करण्यात येत अाहे. यापुढेही ही कारवाई अशीच चालू राहणार असून नागरिकांनी स्वच्छता ठेवून पालिकेला सहकार्य करावे.