पिंपरी : तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर समर्थकांसह मोटारीतून जंगी मिरवणुक काढणार्या गुंड गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ फेब्रुवारी रोजी गजानन मारणे याची तळोजा कारगृहातून सुटका झाल्यावर त्याच्या समर्थकांनी शेकडो गाड्यांमधून त्याची जंगी मिरवणुक काढली होती. त्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर पहिला गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी कोथरुडमध्ये दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता बुधवारी रात्री हिंजवडी पोलीस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस नाईक आबासो कुंडलिक सुळ यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना पवना पुल ते चांदणी चौक दरम्यान १७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजून ५० ते ९ वाजून २० मिनिटे या काळात घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारा पवना पूल ते चांदणी चौक या दरम्यान बंगलुरु - मुंबई हायवे रोडने तळोजा कारागृहातून सुटलेला गुन्हेगार गजानन पंढरीनाथ मारणे (रा. कोथरुड) हा त्याच्या पांढर्या रंगाच्या गाडीमधून प्रवास करुन त्याने त्याच्या गाडीच्या आजू बाजूला सुमारे १०० ते १५० समर्थकासह ३० ते ३५ चारचाकी गाड्या चालवून, गाड्यांचे बाहेर प्लॅटफार्मवर धोकादायक पद्धतीने उभा राहून, गाड्यांमधून अर्धवट शरीर बाहेर काढून, रस्त्याच्या कडेला होऊन गाड्या थांबवून सार्वजनिक रस्त्याने मुंबईकडून बंगलुरुकडे जाणार्या वाहनचालकांना त्यांचा हक्क असताना त्यापासून वंचित ठेवले़ दहशतीच्या जोरावर वंचित ठेवून घोषणाबाजी करुन इतर वाहनचालकांना पुढे जाऊ न देता, वाहनचालकांना शिवीगाळ करुन दहशत निर्माण करीत चारचाकी वाहनाने प्रवास करीत असताना दिसून आले. आम्ही वरील वाहनचालकांना थांबवण्याचा इशारा केला असता न थांबता निघून गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.न्यायालयाने कोथरुडमधील गुन्ह्याबाबत गजानन मारणे याला जामीन मंजूर केल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
कुख्यात गुंड गजानन मारणेसह समर्थकांवर हिंजवडीत तिसरा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 10:06 AM