पुणे : पहिल्या पत्नीशी रीतसर घटस्फोट न घेताच पतीने दुसरे लग्न केले. तिला मारहाण करुन जबरदस्तीने माहेरी पाठवून देत त्याने तिस-या लग्न करण्याची सुरुवात केली. यासगळ्यात निराधार झालेल्या दुस-या पत्नीने मुलाचा ताबा व पोटगी मिळावी म्हणून न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अरुणा आणि रमेश यांना अभिषेक नावाचा सहा वर्षांचा मुलगा आहे. तो सध्या रमेशच्या ताब्यात आहे. मात्र रमेशने त्याचा ताबा अरुणा यांना देण्यास नकार दिला आहे. घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणे हिंदू विवाह कायद्यानुसार गुन्हा आहे. असे असतानाही त्याने दोन महिलांबरोबर लग्न केले. तसेच त्याच्या तिस-या पत्नीने व त्याने दोन नंबरच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण केली. एवढेच काय तिला पोटच्या मुलाला देखील भेटू दिले नाही. त्यामुळे न्यायालयात धाव घेतल्याचे तिने दाखल केलेल्या दाव्यात नमूद करण्यात आले आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, अरुणा यांचे डिसेंबर 2011 साली रमेश बरोबर लग्न झाले. मात्र रमेशने त्याचे यापूर्वीच लग्न झाले असून त्याला तीन मुली असल्याची माहिती अरुणा यांच्यापासून लपवून ठेवली. पुन्हा लग्न न होण्याच्या भीतीने व रमेशने दोघींना नांदविण्याचे वचन दिल्याने अरुणा यांनी याबाबत तक्रार केली नव्हती. लग्नानंतर काही महिन्यांतच रमेशने विविध कारणांवरून अरुणा यांना मारण्यास सुरवात केली. तब्येत बिघडल्याने रमेशने अरुणा यांना एप्रिलमध्ये जबरदस्ती माहेरी पाठवले. त्यानंतर काही दिवसांतच पतीने अनुराधा (सर्व नावे बदललेली) नावाच्या महिलेबरोबर लग्न केल्याचे समजले. याबाबत जाब विचारण्यासाठी फोन केला असता रमेशने अरुणा यांना फोनवरून शिवीगाळ केली. तर अनुराधा हिने जीवे मारण्याची धमकी दिली. सासरी केल्यानंतर रमेशने मारहाण केल्याची तक्रार अरुणा यांनी दाखल केलेल्या दाव्यात नमूद आहे. अॅड. पुष्कर पाटील, अॅड. करिष्मा पाटील आणि अॅड. रेश्मा सोनार यांच्यामार्फत दावा करण्यात आला आहे.
घटस्फोट न घेताच तिस-या लग्नाकरिता बांधल्या मुंडावळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 12:05 PM
घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणे हिंदू विवाह कायद्यानुसार गुन्हा आहे.
ठळक मुद्देपत्नीची मुलाचा ताबा व पोटगी मिळण्यासाठी न्यायालयात याचिका दुस-या पत्नीला केली बेदम मारहाण