पुणे: वाहनांचा अपघात झाल्यास समोरच्या व्यक्तीला आर्थिक मदत मिळावी याकरिता थर्ड पार्टी विमा (third party insurance) काढला जातो. अनेकजण वाहनाचा पूर्ण विमा काढतात. तर काहीजण थर्ड पार्टी विमा काढतात; मात्र हाच विमा १ एप्रिलपासून महाग होतोय. वाहनांच्या सीसीवर याचे प्रीमियम अवलंबवून आहेत. यात दुचाकी व चारचाकीचा समावेश आहे.
गेल्या काही दिवसांत पुणे शहरांत अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनधारकांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी वाहनांवर विमा असणे गरजेचे आहे. अपघातात वाहनाचे नुकसान झाले अथवा वाहनधारकाचा मृत्यू झाला तर अशावेळी विमा असल्यास नुकसान भरपाई मिळण्यास मदत होते.
इलेक्ट्रॉनिक वाहनांना फायदा :
इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढत आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात इ वाहनांची खरेदी करावी याकरिता राज्य व केंद्र सरकार विशेष सवलत देत आहे. त्यामुळे वाहनधारकांना स्वस्तात इ वाहने उपलब्ध होण्यास मदत मिळत आहे.
थर्ड पार्टी विमा म्हणजे काय :
थर्ड पार्टीमध्ये पहिला पक्ष (पार्टी ) हा वाहनमालक असतो. दुसरा पक्ष हा वाहन चालक असतो.अपघात झाल्यास अपघातग्रस्त व्यक्ती हा तिसरा पक्ष समजला जातो. अपघातग्रस्तास नुकसानभरपाई देण्याची जवाबदारी वाहन मालकांवर असते. वाहनावर थर्ड पार्टी विमा असेल आणि अपघात झाल्यास विमा कंपनी अपघातग्रस्त व्यक्तीस नुकसान भरपाई देते.
काय आहेत नवे दर :
प्रस्तावित दरानुसार १ एप्रिलपासून १००० सीसी इंजिन असलेल्या खासगी कारच्या थर्ड पार्टी विम्यासाठी २,०९४ रुपये लागतील. आधी तो २००२ रुपयांत येत होता. १००० ते १५०० सीसी कारच्या विम्यासाठी आता ३,२२१ रुपयांना ३४१६ झाला आहे. १५०० सीसीपेक्षा अधिक क्षमतेसाठी कारसाठी ७८९० रुपयांपेक्षा ७,८९७ रुपये लागतील.