मुंबई : केईएम, नायर रुग्णालयात काेविशिल्ड लसीच्या चाचण्यांचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. हा टप्पा लवकरच संपणार असून, त्यानंतर लगेचच तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू करण्यात येतील.
नायर रुग्णालयामध्ये १४८ जणांना लसीचा पहिला डोस तर ९६ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू करण्यात येतील. आयसीएमआरने पहिल्या टप्प्यात १०० जणांना लस टोचण्यास संमती दिली होती. त्यानंतर अतिरिक्त ४८ जणांना ही लस देण्यात आली. केईएम रुग्णालयामध्ये लस चाचण्यांचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. येथे शंभर जणांना लस देण्यात आली असून इतर ९५ जणांना लसीचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया येत्या एक ते दोन दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
स्वयंसेवकांच्या प्रकृतीवर वर्षभर ठेवणार लक्षलोकमान्य टिळक रुग्णालयास कोरोना चाचण्यांसाठी एथिकल कमिटीची मान्यतेची प्रतीक्षा आहे. या रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लसीच्या चाचणीसाठी रुग्णालयात एक हजार स्वयंसेवकांची नोंदणी केली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी व डॉक्टरांचाही यामध्ये समावेश असेल. लस दिलेल्या स्वयंसेवकांच्या प्रकृतीवर पुढील वर्षभर लक्ष ठेवण्यात येईल. या चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वसामान्यांकडून विचारणा होत आहे.