लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाबाधितांची संख्या या आठवड्यात तिसऱ्यांदा एक हजाराच्या आत आली असून, सोमवारनंतर गुरुवारी व शुक्रवारीही कोरोनाबाधितांची वाढ ही तीन आकडीच राहिला आहे. आज दिवसभरात ९७३ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, २ हजार ४९६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी पुण्यातील सक्रिय रुग्णसंख्या १४ हजारांच्याही आत आली असून, सध्या शहरात १३ हजार ४७९ सक्रिय रुग्ण आहेत.
शहरातील रुग्णसंख्या सातत्याने घटत असली तरी तपासणी करून घेणाऱ्यांचे प्रमाण आजही अकरा हजाराच्या पुढेच आहे. शुक्रवारी ११ हजार ६७६ जणांनी तपासणी करून घेतली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ८.३३ टक्के इतकी आहे. दिवसभरात ६३ जणांचा मृत्यू झाला असून, आजचा शहरातील मृत्यूदर हा १़.७० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ४ हजार २७९ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. तर गंभीर रुग्ण संख्याही १ हजार ३१५ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २४ लाख १६ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ६४ हजार ७६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ४२ हजार ६६९ जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर आतापर्यंत शहरात ७ हजार ९२८ जणांचा मृत्यू झाला आहे.