लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्माण झालेल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढाकार घेतला असून गेल्या दोन महिन्यांत १६ ऑक्सिजन प्रकल्प प्रत्यक्ष सुरू देखील झाले आहेत. पुढील दोन महिन्यांत आणखी प्रस्तावित ३८ ऑक्सिजन प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे सध्या १३ हजार ९३ एलपीएमने ऑक्सिजन क्षमता वाढली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्ण संख्या वाढली तशी ऑक्सिजनच्या मागणीत वाढ होत गेली. जिल्ह्यात कोरोना ‘पिक’वर असताना दिवसाला तब्बल ३१० टन ऑक्सिजन पुरवठा लागत होता. परंतु पुण्यासोबतच संपूर्ण राज्यातच ऑक्सिजनची मागणी वाढल्याने प्रचंड तुटवडा निर्माण झाला. शासनाने औद्योगिक वापराचा ऑक्सिजन पूर्णपणे बंद करत राज्यात तयार होणारा ऑक्सिजन शंभर टक्के ऑक्सिजन वापर आरोग्यासाठी राखीव ठेवला. त्यानंतर देखील ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने बाहेरच्या राज्यातून ऑक्सिजन मागविण्यात आला.
परंतु हीच परिस्थिती कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर कायम राहिल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळेच प्रशासनाने तातडीन जिल्ह्यात ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी हाॅस्पिटलनिहाय प्रकल्प प्रस्तावित केले. जिल्ह्यात ५४ ऑक्सिजन प्रकल्प प्रस्तावित केले. यात पुणे महापालिका हद्दीत १७ पैकी सहा सुरू झाले, पिंपरी-चिंचवड शहरात प्रस्तावित ७ पैकी २ प्रकल्प सुरू झाले आणि ग्रामीण भागात २० पैकी ८ प्रकल्प सुरू झाले. ससूनमध्ये एक प्रकल्प वाढविण्यात येणार असून, क्षमता दुपटीने वाढविण्यात येणार आहे. सध्या ३८ ऑक्सिजन प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे.