इंदापूर : तालुक्यातील कोणत्याही लहान मुलांना कोरोना विषाणूचा त्रास होऊ नये, यासाठी बाल आरोग्य विभागाने माहिती पुस्तिका प्रसारित केली असून, ही पुस्तिका प्रत्येक पालकांपर्यंत जाईल. यामधील सर्व सूचनांचे तंतोतंत पालन पालकांनी करावे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांची अतिशय काळजी कुटुंबाने घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेबाबतची पूर्वतयारी व बाल आरोग्य माहिती पुस्तिकेचे प्रकाशन रविवार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास शेळके, डॉ. विनोद राजपुरे, इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे, युवा उद्योजक संजय दोशी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, मुख्याधिकारी रामराजे कापरे उपस्थित होते.
दत्तात्रय भरणे म्हणाले की, रोगप्रसाराचे मार्ग प्रत्येक कुटुंबातील नागरिकांनी रोखले पाहिजे, तरच तिसऱ्या लाटेवर आपणास विजय मिळवणे शक्य आहे. सध्या इंदापूर तालुक्यामध्ये २१ हॉस्पिटलमध्ये मुलांवर उपचार योग्य पद्धतीने केले जातील. यामध्ये २८३ बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. तर, ऑक्सिजन बेड संख्या १४२ उपलब्ध आहे. आयसीयू बेड संख्या ३३ आहे. त्यामुळे उपचारा वाचून बाधित झालेल्या मुलांवर योग्य उपचार तालुक्यामध्ये केले जातील. स्वॅब कलेक्शन केंद्र इंदापूर, निमगाव केतकी, भिगवण, वालचंदनगर, इंदापूर, बावडा, सणसर, कळस येथे करण्यात आलेली आहे. तब्बल ५६० बेड कोविड केअर सेंटर मध्ये उपलब्ध आहेत. अशीही माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरणार
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाची राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्व शासकीय अधिकारी यांच्या समवेत पाहणी केली. या वेळी उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड व साधे बेड तसेच उपलब्ध असलेल्या यंत्रसामग्री यांची पाहणी केली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडून मनुष्यबळाची मागणी करण्यात आली. या वेळी राज्यमंत्री यांनी लवकरच सर्व पदे भरण्यात येतील, अशी ग्वाही दिली. उपस्थित असलेल्या परिचारिका यांची विचारपूस केली.
२७ इंदापूर
आरोग्य माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करताना दत्तात्रय भरणे, प्रदीप गारटकर व इतर.