केदार कदम
पाषाण : बालेवाडी येथे पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारीची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना नागरिकांनी विठ्ठल मंदिरामध्ये दोन तास कोंडून ठेवून आपला राग व्यक्त केला. यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क करून आपली सुटका करून घेतली.
बालेवाडी गावठाण परिसरामध्ये अवघा अर्धा तास पाणी सोडण्यात येते. नागरिकांच्या तक्रारीकडे प्रशासनाचे अधिकारी गांभीर्याने पाहत नाहीत. योग्य उपाययोजना वेळेवर होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पुणे महानगरपालिका आयुक्त यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देऊनही पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. यासाठी बालेवाडी येथे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकण्यासाठी अधिकाऱ्यांना एकत्रित बोलवले होते. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत बालेवाडी येथील विठ्ठल मंदिरामध्ये कोंडून ठेवले. पाणीपुरवठा अधिकारी एकनाथ गाडेकर, श्रीधर कामत, अशोक सांगडे, लाईनमन भाऊराव पाटोळे व एल अँड टी कंपनीचे अधिकारी यांना नागरिकांनी कोंडून ठेवले.
दुपारी दोन वाजल्यापासून ते सव्वाचार वाजेपर्यंत अधिकारी विठ्ठल मंदिरामध्ये अडकून पडले होते. यानंतर अधिकाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पोलीस कर्मचारी दाखल झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी कुलूप तोडून अधिकाऱ्यांची सुटका केली.
आमच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला
याठिकाणी बालेवाडी गावठाणात दोन-तीन दिवस पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने या भागातील संतप्त नागरिकांनी आमच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. मंदिरात कोंडून ठेवले. तरी या भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा केली जाईल. - प्रसन्न जोशी, अधीक्षक अभियंता चतु:शृंगी पाणीपुरवठा विभाग
रोजच्या या प्रश्नाला आम्ही बालेवाडीकर कंटाळलो
पाणी येण्याची वेळही नक्की नाही. पाणी येते तेही खूप कमी दाबाने येते. तक्रार करूनही काही फायदा होत नाही. पाणीप्रश्नामुळे आम्ही नागरिक हैराण झालो आहोत. एवढा धो धो पाऊस पडतो आहे. धरणे भरली असूनही आम्हांला मात्र तीन तीन दिवस पाणी येत नाही. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी परिस्थिती आमची झाली आहे. आम्ही घरपट्टी, पाणीपट्टी वेळेत भरतो. सगळ्यात जास्त मनपाला कर जमा होतो. तो आमच्याच भागातून तरी पाण्यासारखी मूलभूत गरज प्रशासनाला भागवता येत नाही. रोजच्या या प्रश्नाला आम्ही बालेवाडीकर कंटाळलो आहोत. - त्रस्त ग्रामस्थ, बालेवाडी
पाणी देण्याऐवजी प्रशासन अधिकारी नवीन कारणे देत आहेत
वारंवार बालेवाडीमधील विस्कळीत पाणीपुरवठ्याची तक्रार करत आहेत. नागरिकांना पाणी देण्याऐवजी प्रशासन अधिकारी नवीन कारणे देत आहेत. यामुळे नागरिक संतप्त झाले व त्यांनी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले. प्रशासनाने आता तरी नागरिकांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा. - अमोल बालवडकर, माजी नगरसेवक.
उपाययोजनांवरती काम होणे आवश्यक
नागरिकांचा पाणीप्रश्न सुटला पाहिजे, परंतु अधिकाऱ्यांना डांबून ठेवून पाणीप्रश्न सुटणार नाही. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक चर्चा होऊन उपाययोजनांवरती काम होणे आवश्यक आहे. - सागर बालवडकर, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.
घटनाक्रम चौकट
१.३० वा. पाणीपुरवठा अधिकारी बालेवाडीतील पाणी समस्या पाहण्यासाठी आले होते. विठ्ठल मंदिरामध्ये असलेल्या नागरिकांची पहिल्या मजल्यावर चर्चा करण्यासाठी पाणीपुरवठा अधिकारी थांबले होते. माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांना काही नागरिकांचा फोन आल्यानंतर ते निघून गेले. पाणीपुरवठा अधिकारी निघून जाऊ नये, म्हणून दोनच्या दरम्यान नागरिकांनी मंदिराच्या गेटला कुलूप लावले. दरम्यान, अधिकाऱ्यांनी पहिल्या मजल्यावरून उतरण्याचा यशस्वी प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी संबंधित नागरिकांशी फोनद्वारे चर्चा करून कुलूप लावणाऱ्या नागरिकांशी संपर्क साधून कुलूप उघडण्याची विनंती केली. ३.३० दरम्यान अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून पोलिसांची संपर्क केला. ३.४५ वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ४. १५ वा. दरम्यान पोलिसांनी दरवाजाचे कुलूप तोडून अधिकाऱ्यांची सुटका केली.