- योगेश कणसे बिजवडी : इंदापूर तालुक्यातील वनक्षेत्रात वन विभागाच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा निधी वन्यप्राणी संवर्धन तसेच विविध विकासकामांसाठी मिळत आहे. मात्र, केवळ वन अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निष्क्रियतेमुळे वन्यप्राण्यांसाठी पाणीपुरवठा करण्यास अपयशी ठरल्याने प्राण्यांचे हाल होत आहेत.इतर तालुक्यांच्या तुलनेत इंदापूर तालुक्यातील वनक्षेत्र आकाराने मोठे आहे. परिणामी वन्यप्राणी तसेच चिंकारा जातीच्या हरणांसह विविध पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काही दिवसांपासून वनक्षेत्रातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने पाणवठे कोरडेठाक पडले आहेत. परिणामी वन्यप्राण्यांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळत आहेत. हेच पाण्यासाठी भटकणारे प्राणी एखाद्या विहिरीत किंवा शेततळ्यात पडल्याने जखमी होतात. काही वेळा तर पाण्याच्या शोधत निघालेल्या प्राण्यांना भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागत आहे. तर, काही प्राणी महामार्गावरील वाहनाच्या धडकेत जखमी होत आहेत. वनक्षेत्रातील पाणवठे कोरडे ठाक पडून वन्य जिवांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेल्या सौर पंपांचा पुरता बोजवारा उडालेला आहे. वन खात्याच्या जंगलात तेही प्रामुख्याने महाराष्ट्रातील वनात आढळणारे सांबर, चितळ, चिंकारा या जातीची हरणे आहेत. हरणांच्या या जाती वन विभागाच्या गलाथन कारभारामुळे आणि शिकारीमुळे नष्ट होण्याच्यामार्गावर आहेत.सापमार गरूड, मोर, अदी पक्षी, विविध प्रकारच्या औषधी वनस्पती,फळाफुलांची झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.एकीकडे वनसंपदेचा होणारा ºहास बघता वन्यजीवांचा सुरक्षित अधिवास धोक्यात आला आहे. आता त्यांचे हक्काचे घरंच सुरक्षित राहीलेले नाही. तृणभक्षक प्राण्यांची व जंगलातील पाणवठ्यांची संख्या गोठवली आहे. लाखो रुपये खर्चून वन्यजीवांच्या पाण्यासाठी असलेल्या सौर पंपांचा पुरता फज्जा उडाला आहे. इंदापूर तालुक्यांत वन्य जीव संरक्षणासाठी असलेल्या योजनांचा बोजवारा उडाला आहे.टँकरचे काढले जाते बोगस बिल...वनक्षेत्रातील पाणवठे कोरडे पडले आहेत. पाण्याच्या शोधार्थ वन्यजीव मानवी वस्तीतकडे येताना दिसतात. त्यातच त्यांना अपघाताला, भटक्या कुत्र्यांना सामोरे जावे लागते. यातूनच त्यांच्या जीवितास धोका पोहोचतो. पाणवठे भरण्यासाठी नेमलेले टँकर ठेकेदार बोगस बिले काढतात, असा आरोप पर्यावणरप्रेमींनी केला आहे.तसेच, काही वन्यजीव प्राणी संघटना आपले खिसे भरण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत साटेलोटे करून देखावा करत आहेत.जर हे असेच सुरू राहिले तर वन्यजीवसृष्टी नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही, अशी खंत वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. तरी, वन्यजीव संरक्षक विभागाने तातडीने योग्य कारवाई केली पाहिजे.वन विभागातील सर्व पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी सोडण्याचे काम सुरू आहे. ज्या पाणवठ्यांमध्ये पाणी नाही त्या ठिकाणी त्वरित पाणी सोडण्यात येईल.- राहुल काळे,वनपरिक्षेत्रअधिकारी, इंदापूर
पाण्याअभावी तहानले वन्यजीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 2:37 AM