लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेला मिळकतकर आकारणी विभागाने मोठा बूस्टर दिला आहे़ महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांतच तब्बल १ हजार ३०० कोटी रुपयांचे उत्पन्न या विभागाने मिळवून दिले आहे़
कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गत आर्थिक वर्षात म्हणजे सन २०१९-२० मध्ये संपूर्ण वर्षात १ हजार २९२ कोटी रुपये मिळकत कर जमा झाला होता़ मात्र यावर्षी पहिल्या नऊ महिन्यांत म्हणजे ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच तब्बल १ हजार ३०० कोटी रुपये मिळकतकर जमा झाला आहे़ विशेष म्हणजे या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सुमारे दीड महिना लॉकडाऊनमुळे कर भरणा केंद्रे बंद होती़ तर या खात्यातील सर्व सेवकवर्ग पाच-सहा महिने कोरोना आपत्ती निवारण कामकाजात व्यस्त होते़ अशावेळी ऑनलाइन कर भरण्यासाठी केलेले आवाहन व मिळकत करावरील शास्तीतील (व्याज) सवलत देणारी राबविलेली ‘अभय योजना’ यामुळे आपत्ती काळातही महापालिकेला इतिहासात प्रथमच तेराशे कोटींचे उत्पन्न मिळाले आहे़
१ एप्रिल ते ३१ डिसेंबर,२०२० या नऊ महिन्यांच्या कालावधीत सुमारे ७ लाख २९ हजार १७३ मिळकतधारकांनी १ हजार ३०१ कोटी २५ लाख रुपये मिळकतकर भरला आहे़ यामध्ये ७६़२६ टक्के कर रक्कम ही ऑनलाइन जमा झाली आहे़ मागील वर्षी पहिल्या नऊ महिन्यांत १ हजार ९२ कोटी ८४ लाख रुपये मिळाले होते़
‘अभय योजने’तून २ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान महापालिकेला ३५१ कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, या योजनेला आता जानेवारी २०२१ अखेरपर्यंत मुदतवाढ दिल्याने १५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत ७० कोटी २६ लाख मिळकत कर मिळाला असल्याचेही विलास कानडे यांनी सांगितले़