त्यामुळे येथे भाजी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना कोरोना संसर्गाची लागण होण्याचा धोका वाढत आहे. या परिस्थितीवर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने बघ्याची भूमिका घेतलेली दिसते. त्यामुळे ही भाजी मंडई लॉकडाऊन काळात बंद करावी, अशी मागणी खडकी परिसरातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
पुण्यात लॉकडाऊन सुरू झाला त्या वेळी भाजी मंडई सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने घेतला होता. त्या वेळीही प्रशासनाने दिलेले नियम पाळून व्यवसाय करणार असल्याचे येथील भाजी विक्रेत्यांनी सांगितले होते.
सुरुवातीला काही अंशी विक्रेत्यांनी नियम पाळलेही, पण अनेक भाजीविक्रेते विनामास्क विक्री करताना आढळत होते. त्या वेळी क्षुल्लक विक्रेत्यांवर केवळ दिखाऊ कारवाई खडकी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केली. फक्त चार दिवस सर्व व्यवस्थित सुरू होते. मात्र आता पुन्हा या मंडईत कोरोनासंबंधी कोणतेच नियम भाजी व फळविक्रेते पाळताना दिसत नाही. काही विक्रेते सोडल्यास अनेक विक्रेते कधीच मास्क घालत नाहीत. सोशल डिस्टन्सचा फज्जा भाजी मंडईत उडत आहे. खडकी बोर्ड याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे समोर येत आहे. बोर्डाचे अधिकारी नावापुरतेच फेऱ्या मारीत असतात, तर बोर्डाचे आरोग्य अधीक्षक सांगतात की बोर्डाचे कुठे कुठे लक्ष द्यायचे. आम्ही अधिकारी नाही वॉचमन झालो आहे, असे बोर्डाचे अधीक्षक सांगत आहेत . त्यामुळे खडकीत या भाजी मंडईमुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होण्याचे टाळता येत नाही. याकडे प्रशासनाने गांभीर्याने विचार करून भाजी मंडईत विशेष लक्ष केंद्रित करावे, अशी मागणीही नागरिक करीत आहेत.