श्रीकिशन काळे- पुणे : पुणे शहरात विविध विकासकामे केली जात असून, त्याला अडथळा ठरणाऱ्या हजारो वृक्षांवर कुऱ्हाड पडत आहे. गेल्या वर्षभरात पुणे महापालिकेने सुमारे १३ हजार वृक्ष तोडण्यास आणि पुनर्रोपण करण्यास परवानगी दिली आहे. त्याबद्दल्यात सुमारे ५ कोटी रुपयांची अनामत रक्कमही पालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. अनेक जण वृक्ष लावत नसल्याने त्यांची रक्कम तशीच पालिकेकडे पडून राहते. महापालिकेने फेब्रुवारी २०१८ ते एप्रिल २०१९ या कालावधीत महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने शहरातील पूर्ण वृक्ष काढणे/पुनर्रोपण करणे यास परवानगी दिली आहे. विविध भागात विविध विकासकामांना बाधित होणाऱ्या एकूण १३,००५ झाडांपैकी ५,७२७ झाडांना पूर्ण वृक्ष काढण्यास तर, ७,५०३ झाडांचे पुनर्राेपण होणार आहे. अर्धी झाडे शासकीय विभागांकडून तोडली जाणार असल्याने त्यांना अनामत रक्कम नसते. झाडे तोडणे, पुनर्रोपण करणे या कामासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ठेकेदाराला अधिकृत करावे लागते. ते केलेले नाही. अनेकदा पुनर्रोपणासाठी दाखवलेली झाडे सरळ जमीनदोस्त केली जातात. झाडांचे पुनर्रोपण हे अनुभवी, या क्षेत्राची माहिती असलेले तज्ज्ञ मंडळी करू शकतात. तसे तज्ज्ञ संबंधितांकडे नाहीत, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक चैतन्य केत यांनी ‘लोकमत’ला सांगितली. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ कायद्यानुसार तोडलेल्या/पुनर्रोपण केलेल्या एका झाडाच्या बदल्यात ३ झाडे लावणे या अटीवर ही परवानगी दिली जाते. त्यानुसार या कालावधीत या निर्देशपत्रांनुसार असे लक्षात येते की, एकूण ३४,३०६ नवीन झाडे लावण्याचे निर्देश वृक्ष प्राधिकरणातर्फे दिले गेले आहेत. खरे तर नवीन झाडे लावणे यांची संख्या १३,००५ ७ ३ = ३९,०१५ होणे गरजेचे आहे. पण तेवढी लावली का, ते पाहायला हवे. .......शासकीय कार्यालयांकडून अनामत नाही नवीन झाडे लावण्यास कटिबद्ध करण्यासाठी अर्जदारांकडून १ झाडास १०,००० रु. या प्रमाणे अनामत रक्कम पुणे महापालिकेकडे स्वीकारली जाते. पण काही नागरिक, संस्था यांना या अनामत रकमेला मुभा देण्यात आली आहे. पुणे मनपाचे विविध विभाग जसे रस्ते विभाग, सार्वजनिक बांधकाम, भवन रचना विभाग इत्यादींकडून काहीही अनामत रक्कम स्वीकारण्यात येत नाही. - चैतन्य केत, पर्यावरण अभ्यासक......१) महामेट्रो विकसन प्रकल्प २) नवीन रस्ते बांधणी, रस्ते रुंदीकरण ३) विविध प्रकारच्या बांधकामांस अडथळा ४) नियोजित बांधकामास व बेसमेंटच्या खोदाईमध्ये येत आहे.५) वृक्ष चौकात असून वाहतुकीस अडथळा ६) वृक्ष स्विमिंग पुलाच्या नियोजित बांधकामास अडथळा ७) वृक्ष एका बाजूला झुकला आहे, संभाव्य धोका टाळण्यासाठी ८) वृक्ष गेटसाठी ड्राइव्हसाठी अडथळा ठरत आहे ९) वृक्ष मेन गेटसमोर असंतुलित वाढल्याने, वाहनाच्या टपाला बुंध्या घासत असल्याने १०) वृक्ष वठले आहे ११) वृक्ष अमेनिटी स्पेसच्या जागी आहे १२) वृक्ष अंतर्गत रस्त्यामध्ये येत असल्याने गाड्या जाण्या-येण्यास अडथळा निर्माण होत आहे १३) वृक्ष हवेमुळे इमारतीस धडकत असल्याने १४) झावळ्या व नारळ पत्र्यावर पडून सतत पत्रे तुटत आहेत १५) वृक्ष प्रवेशद्वारामध्ये येत आहेत. १६ वृक्ष असंतुलित झालेले आहेत१७) वृक्ष घराच्या स्लॅबवर टेकलेला असून घरात हादरे बसतात १८) वृक्ष भिंतीला टेकलेला असल्यामुळे भिंत पडून जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी १९) वृक्ष रस्त्यावर मध्यभागी आहे, त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो व वारंवार अपघात होतात २०) वृक्षाच्या खोडात वाळवी लागली असल्यामुळे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी.......या झाडांव्यतिरिक्त क्षेत्रीय कार्यालय पातळीवर वृक्ष अधिकारी यांच्याकडून ठराव क्रं. ४२ नुसार, झाड वठले आहे, कीड लागली आहे, झाड उन्मळून पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जीवितास हानी होत आहे यासंबंधी प्राप्त झालेल्या अर्जावर पूर्ण वृक्ष काढणे/ पुनर्रोपण करणे यास तत्काळ परवानगी देण्यात येते. तसेच परवानगी न घेताही मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केली जाते. ही संख्या विचारात घेतली असता पुण्यात मागच्या वर्षभरात तोडण्यात आलेल्या झाडांची संख्या मोठी असणार आहे. ......योग्य काम न केल्याने पालिकेला एनजीटीचा दणका झाड तोडण्यासाठी परवानगी देताना महापालिका अनामत रक्कम घेते. या बदल्यात महापालिकेने वृक्ष लावणे आवश्यक असते. परंतु, महापालिकेने २००० ते २००९ दरम्यान नवीन झाडे लावली नाहीत. त्यामुळे २०१४ मध्ये अनामत रकमेपोटी जमा झालेले ६ कोटी ४० लाख १६ हजार रुपये इसक्रो खात्यात जमा करण्याचा आदेश दिला होता. २००० ते २००९ या नऊ वर्षांत पालिकेकडे ६ कोटी रुपये जमा झाले होते. परंतु, गतवर्षी एका वर्षातच सुमारे ५ कोटी रुपये जमा झाले आहेत. यावरून वृक्षतोडीला गतवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात परवानगी दिली गेली आहे. ...........एखादे झाड एका ठिकाणाहून काढून दुसरीकडे लावणे शक्य असते. परंतु, त्यासाठी एक प्रक्रिया असते. ती प्रक्रिया योग्य केली तरच, झाड दुसºया ठिकाणी जगते, अन्यथा ते मरते. वड, पिंपळ, कडूलिंब आदी झाडांना खूप मुळे असतात. हे देखील इतर ठिकाणी पुनर्रोपित करता येतात. त्यासाठी काळजी घ्यावी लागते. - केतकी घाटे, पर्यावरण तज्ज्ञ ........एक वृक्ष तोडण्यासाठी १० हजार रुपये अनामत रक्कम घेतली जाते. संबंधित व्यक्तींनी त्याबद्दल्यात तीन झाडे लावायची असतात. दोन वर्षांनी आम्ही त्यांची लावलेली झाडे पाहून त्यांना अनामत परत करतो. परंतु, काहीजण झाडे लावली, तरी ते क्लेम करत नाहीत. तेव्हा ही रक्कम महापालिकेकडे जमा असते. - गणेश सोनुने, वृक्ष प्राधिकरण समिती, महापालिका ........
पुण्यात विकासकामांसाठी तेरा हजार झाडांचे मरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 2:07 PM
महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने शहरातील पूर्ण वृक्ष काढणे/पुनर्रोपण करणे यास परवानगी दिली आहे. त्याबद्दल्यात सुमारे ५ कोटी रुपयांची अनामत रक्कमही पालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे.
ठळक मुद्देवृक्ष प्राधिकरणाकडून वर्षभरात दिली परवानगी पुनर्रोपण करणे बंधनकारक, अनेकांकडून होते दुर्लक्ष शासकीय कार्यालयांकडून अनामत नाही