पुणे : शिक्षण विभागातर्फे अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. आता येत्या १४ ऑगस्टपासून विशेष प्रवेश फेरीच्या माध्यमातून रिक्त जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. मात्र, सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही अकरावीच्या सुमारे ३० ते ३५ हजार जागा रिक्त राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने दिले जात आहेत. त्यासाठी तीन प्रवेश फेऱ्या घेण्यात आल्या आहेत. परंतु, तरीही अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे विशेष फेरीच्या माध्यमातून अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिले जाणार आहेत. पहिल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जावून प्रवेश निश्चित करणे बंधनकारक होते. परंतु, अशा अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत. त्यामुळे या विशेष फेरीतून अशा सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. तीन फेऱ्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी अकरावीत प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे विशेष फेरीचे मेरिट खाली येईल, असे काही विद्यार्थ्यांना वाटत असेल. परंतु, पहिला पसंतीक्रम देवूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना या फेरीतून प्रवेश देण्यात येणार आल्याने विशेष फेरीचे मेरीट खाली येणार नाही, असे शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.--
यंदा अकरावी प्रवेशाच्या जागा वाढल्या असून दहावीच्या निकालात घट झाली आहे. त्यातच अनेक विद्यार्थ्यांनी आयटीआय व पॉलिटेक्निक अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे. त्यामुळे यंदा अकरावीच्या ३० ते ३५ हजार अकरावीच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. मिनाक्षी राऊत, शिक्षण उपसंचालक, पुणे