पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांना माहिती दिली; पण दि. ३० ऑगस्ट २०१३ ते फेब्रुवारी २०१६ पर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. मी तीस महिने वाहिन्यांवर दाभोलकर हत्येच्या बातम्या पाहात होतो; पण पोलिसांशी कोणताही पत्रव्यवहार केला नाही. त्यानंतर कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतरच्या तासाभरातच मी कोल्हापूरचे डीवायएसपी आणि राजापुरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना सक्षम भेटलो. मात्र, त्यांनी माझा जबाब नोंदविला नाही, असे कोल्हापूर येथील व्यावसायिक संजय साडविलकर यांनी उलट तपासणीदरम्यान न्यायालयात सांगितले.
विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे अशा पाच आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येमध्ये तावडे याचा सहभाग असल्याचा संशय साडविलकर यांनी व्यक्त केला होता. केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी साडविलकर यांची साक्ष नोंदवली. त्यावर बचाव पक्षातर्फे प्रकाश साळसिंगीकर यांनी त्यांची उलट तपासणी घेतली.
मी शिवप्रतिष्ठानचा कार्यकर्ता होतो असे साडविलकर यांनी सांगताच त्याचा काही पुरावा आहे का? असे विचारल्यानंतर वृत्तपत्रात नाव आले होते; पण पुरावा आणू शकत नसल्याचे साडविलकर यांनी सांगितले. शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडच्या कार्यक्रमात मीच वीरेंद्र तावडे यांना बोलावले होते, असेही साडविलकर म्हणाले. डॉ. दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर आपण पोलीस अधिकारी विजय पाटील यांना कळवले; पण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माहिती दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या सोमवारी (दि. ११) पुन्हा संजय साडविलकर यांचीच उलटतपासणी होणार आहे.
मी पिस्तुलाचा धंदा करीत नव्हतो
वीरेंद्र तावडे २००६ पासून आपल्या संपर्कात होते, त्याने आपल्याकडे पिस्तूल व गोळ्या तयार करून देण्याची मागणी केली होती, अशी साक्ष संजय साडविलकर यांनी न्यायालयात नोंदविली होती. परंतु, मी पिस्तुलाचा धंदा करीत नव्हतो असे साडविलकर यांनी उलटतपासणी दरम्यान सांगितले.