लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : जीवनावश्यक उत्पादने आणि निर्यातक्षम उत्पादने घेणाऱ्या कंपन्यांना परवानगी देण्याच्या निर्णयामुळे उद्योगनगरीतील तीस टक्के कंपन्या सुरू होऊ शकतील. पूर्ण क्षमतेने काम सुरू होऊ शकणार नसल्याचे मत उद्योग क्षेत्रातून व्यक्त करण्यात आले.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एप्रिलअखेरीपर्यंत राज्यात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. औषधे, जीवनावश्यक वस्तू, कृषी, कृषी प्रक्रिया उद्योग, डेअरी, फोर्जिंग उद्योगांना परवानगी दिली आहे. तसेच शहरातून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंची उत्पादन साखळी अबाधित राहणार आहे. या निर्णयामुळे उद्योगनगरीतील बड्या कंपन्या पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाहीत. परिणामी त्यावर अवलंबून असणाऱ्या कंपन्यादेखील पूर्ण क्षमतेने सुरू राहणार नाहीत. तसेच अनेक लघुउद्योग परदेशातील आणि स्थानिक मागणीवर अवलंबून आहेत. निर्यातीच्या कामाशी त्यांचा फारसा संबंध येत नाही. असे ७० ते ७५ टक्के सूक्ष्म आणि लघुउद्योग सुरूच होऊ शकणार नाहीत. उद्योगनगरीत अकरा हजार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आहेत. या सर्व उद्योगांची घडी पुन्हा विस्कळीत होणार आहे.
---
निर्यात आणि जीवनावश्यक वस्तूंशी संबंधित उद्योग सुरू राहणार आहेत. त्यामुळे शहरातील ७० टक्के उद्योग सुरू होऊ शकणार नाहीत. ऑटोमोबाईल संबंधित अनेक वस्तू शहरातून परराज्यात पाठविल्या जातात. त्यांना वेळेत माल न मिळाल्यास कंपन्यांच्या हातातील काम जाण्याची शक्यता आहे. याचा विचार झाला पाहिजे. उद्योगांना सरसकट परवानगी द्यायला हवी होती. त्याचबरोबर उद्योगांना लोखंड, स्टेनलेस स्टील, सुट्टे पार्ट, बेअरिंग अशा गोष्टींची आवश्यकता असते. या वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने किमान चार तास सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. प्रशासनाने कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- संदीप बेलसरे, अध्यक्ष पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना
----
जीवनावश्यक वस्तू आणि निर्यात करणारे उद्योग सुरू राहणार आहेत. त्यामुळे काही बड्या कंपन्यांनी आपली कामे कमी केली आहेत. त्यामुळे अनेक लघु उद्योगांना एका शिफ्टमध्ये काम करावे लागेल. उद्योगांचे कामकाज विस्कळीत होणार आहे.
- जयंत कड, उद्योजक
---
ऑटो मोबाईल कंपन्यांचे कामकाज विस्कळीत ?
जीवनावश्यक वस्तू आणि निर्यातीच्या कामांना परवानगी देण्यात आली आहे. काही बड्या ऑटो मोबाईल कंपनींनी आपले काम कमी केली असल्याची माहिती काही लघुउद्योजकांनी दिली. रुग्णवाहिका, लष्करी वाहने, निर्यातीसाठीच्या वाहनांचे काम सुरू आहे. स्थानिक काम बंद ठेवण्यात आले आहे. टाटा मोटर्सने एका शिफ्टमध्ये काम करण्यास सुरुवात केल्याची चर्चा होती. त्याबाबत टाटा मोटर्सशी संपर्क साधला असता, त्यांनी ब्रेक द चेन या अंतर्गत आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत असल्याचे सांगितले. कोरोनाच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने कंपनीतील ४५ वर्षांवरील कामगारांचे लसीकरण करण्यात येत असल्याचे टाटा मोटर्सने स्पष्ट केले.